माध्यमांतील ‘फ्रंटलाईन वर्कर्स’चे लसीकरण; मुख्यमंत्री कधी घेणार निर्णय ?

Maharashtra Today

मुंबई :- राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ (Frontline Workers) घोषित करून लसीकरणात प्राधान्य द्या, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवून केली आहे. आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. आतातरी मुख्यमंत्री निर्णय घेतील का, असा सवाल पत्रकार विचारत आहेत.

राज्यातील पत्रकार, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी कोरोना (Corona) साथीच्या काळात जीव धोक्यात घालून वार्तांकन व जनजागृती करत आहेत. या सर्व माध्यम प्रतिनिधींना फ्रंट लाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांचे प्राधान्याने लसीकरण करा, अशी विनंती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

राज्यातील पत्रकारांनीही या मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी ऑनलाईन आंदोलन केले होते. सोशल मीडियातूनही पत्रकार सरकारला याबाबत निर्णय घेण्याची मागणी करत आहेत. गृहमंत्र्यांसह महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) अनेक नेत्यांनीही ही मागणी लावून धरली आहे. मात्र, बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही याबाबत निर्णय झाला नाही.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, देशातील सुमारे १२ राज्यांत प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करण्यात आले आहे. दुर्दैवाने, महाराष्ट्रात मात्र हा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारांच्या विविध संघटना यासंदर्भात सातत्याने मागणी करीत आहेत. परवा तर राज्यातील पत्रकारांनी ऑनलाईन माध्यमांतून सांकेतिक आंदोलन सुद्धा केले. कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो. या दुसर्‍या लाटेत सुद्धा या रोगाला बळी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची, जिवितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केल्यास आपसुकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button