पुरवठ्यानुसार उद्यापासून राज्यात लसीकरणाला सुरुवात; मुख्यमंत्र्यांची घोषणा

CM Uddhav Thackeray

मुंबई : महाराष्ट्रातील सहा कोटी नागिरकांच्या लसीकरणासाठी १२ कोटी जे डोस आवश्यक आहेत, ते एकरकमी खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. केंद्राला विनंती आहे, लसीचा साठा उपलब्ध करून द्या. महाराष्ट्र चांगल्या गोष्टीत एक नंबरवर आहे. कोरोनामुक्तीतही एक नंबर होऊन दाखवू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रदिन, कामगारदिनाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. १ मेपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. गरज नसताना रेमडेसिवीर दिल्यास त्याचे दुष्परिणाम होतात. अनावश्यक रेमडेसिवीरचा वापर करू नये ही माझी विनंती आहे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डॉक्टर्स आणि कोविड सेंटर्सना केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज महाराष्ट्रदिनाच्या पूर्वसंध्येला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. रेमडेसिवीरच्या दररोज ५० हजार इंजेक्शन्सची आवश्यकता आहे. केंद्रानं सर्व स्वतःच्या हातात घेतलेलं आहे. आपल्याला सुरुवातीला केंद्रानं ४३ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स  पुरवलीत. रोज ३५ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळतात, असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं. रुग्णांंमध्ये वाढ झाली तर मात्र परिस्थिती अवघड होण्याची शक्यता आहे. सध्या रेमडेसिवीरची मागणी वाढली आहे. आपल्याला ५० हजार इंजेक्शन्सची गरज आहे. केंद्राने ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरच्या वाटपाचं नियोजन आपल्याकडे घेतलं आहे. सुरुवातीला केंद्राने २६ हजारच्या आसपास इंजेक्शन्स मिळतील, अशी व्यवस्था केली होती. नंतर मी मागणी केल्यानंतर आता केंद्राने ४३ हजार इंजेक्शन्स देण्याचे मान्य केले.

सध्या ३५ हजारांच्या आसपास आपल्याला रोज इंजेक्शन मिळत आहेत. गरज नसताना रेमडेसिवीर वापरू नका. गरज नसताना हे इंजेक्शन वापरले तर त्याचे दुष्परिणाम होण्याचे शक्यता टाळता येऊ शकत नाही. त्यामुळे गरज असेल तर रेमडेसिवीरचा वापर करावा, असंही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केलंय. राज्यात बेड्स वाढवले आहेत. जूनमध्ये ३ लाख ३६ हजार होते. आता त्या ४ लाख ३१ हजार आहेत. राज्यात आयसीयू बेड्स ११,८८२ होते, आता २८,९०० बेड्स आहेत. जूनला ३,७७४ व्हेंटिलेटर्स होते. सध्या ११ हजार व्हेंटिलेटर्स आहेत. आपण बेड वाढवू शकतो. पण डॉक्टर, नर्सेस वाढवणे कठीण आहे. विचार केल्यावर एसीमध्ये बसूनसुद्धा घाम फुटतो. बेड वाढवू शकतो, सुविधा वाढवू शकत नाही. डॉक्टर, नर्सेस आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. बाहेरून मिळणाऱ्या ऑक्सिजनचे आपण पैसे देतो. तसेच ऑक्सिजनच्या वाहतुकीचे पैसे देऊन वेळेवर ऑक्सिजन सर्वत्र पुरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपण ही परिस्थिती बॅलन्स राखण्याचा प्रयत्न करतोय. रुग्णसंख्या ही स्थिरावलेली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.जी मदत जाहीर केली त्याची अंमलबजावणी करत आहोत. संपूर्ण जगात लाटांमधून लाटा येत आहेत. किती लाटा येणार हा प्रश्नच आहे.

पहिली लाट येऊन गेली. आता दुसरी लाट आली. आता तज्ज्ञ म्हणत आहेत की तिसरी लाटसुद्धा येणार. तिसरी लाट आली तरी त्याचे एवढे घातक परिणाम होऊ द्यायचे नाही, यासाठी सरकारने कंबर कसली आहे. दुसरी लाट एवढ्या मोठ्या प्रमाणात येईल याची कोणालाच कल्पना नव्हती. तिसऱ्या लाटेत अर्थचक्र थांबता कामा नये. मी कामगार वर्गाच्या युनियन नेत्यांशी बोललो आहे. त्यांनी काय करायला पाहिजे याची मी त्यांना कल्पना दिली आहे. मला खात्री आहे. तिसरी लाट थोपवण्यात यश येणार याची खात्री आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. रोजी मंदावेल, पण रोटी थांबू देणार नाही. या निर्बंधाच्या काळात सुमारे साडेपाज हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले.

पॅकेज जाहीर केलं. पुढे काय झालं आपल्याला कल्पना आहे.  शिवभोजन थाळी १० रुपयांना होती. नंतर ती पाच  रुपयांना केली होती. आता ती मोफत दिली जाते. आतापर्यंत जवळपास चार कोटी लोकांनी  शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. सध्या ८९० शिवभोजन केंद्रे सुरू झाली आहेत. सात  कोटी लोकांना मोफत गहू आणि तांदूळ दिले जात आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. राज्यात १ कोटी ५८ लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं.  देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात आहे. दुर्दैवाने सर्वाधिक रुग्णही महाराष्ट्रात आहेत. १२ कोटी डोस महाराष्ट्राला लागणार आहेत, त्यासाठी एकरकमी चेक देण्याची तयारी महाराष्ट्राने ठेवली आहे. पण लसीचा पुरवठा मर्यादित आहे. उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू करतोय. १८ म्हटलं तर युवा आलाच, आणि युवा आले तर उत्साह आलाच. कोविन ॲप काल क्रॅश झालं. थोडं मार्गी लागेपर्यंत असं होणार. मी पंतप्रधानांना विनंती केली आहे, राज्यांना आपापली ॲपची परवानगी द्या, ते ॲप केंद्राशी कनेक्ट करा. असं झालं तर सोय होईल. ॲपवर नोंदणी करून, माहिती मिळेल, त्या वेळेप्रमाणे केंद्रावर पोहचा. महत्त्वाचं  म्हणजे लस मर्यादित आहे. साधारण जून-जुलैपासून पुरवठा वाढेल.

तोपर्यंत लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये. तिथे झुंबड उडतेय हे मी समजू शकतो. ज्या बातम्या येतात त्याने मन विष्ण्ण होतं. उद्यापासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचं लसीकरण सुरू होतंय, उद्या पहिली लस दिली जाणार आहे, शेवटची नाही. माझं वचन आहे, माझ्या नागरिकांचं लसीकरण पेलायला आपलं सरकार तयार आहे. आपली पूर्ण तयारी झाली आहे. सुरुवातीला शिस्त येईपर्यंत गोंधळ उडेल, पण तो गोंधळ करू नका. लसीकरण केंद्रावर गर्दी करू नका, नाही तर कोरोना प्रसारक केंद्र होईल. काळजी घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.आपल्याकडे ३ लाख ४४ हजार लसी आल्या आहेत. त्या लोकसंख्येनुसार वितरित झाल्या आहेत. आपली क्षमता १० लाखांची दिवसा आहे. आपण पाच लाखांचा टप्पा गाठला आहे. आपण दिवसरात्र मेहनत करून महाराष्ट्र कोरोनामुक्त करू. सहा कोटी नागिरकांच्या लसीकरणासाठी १२ कोटी जे डोस आवश्यक आहेत, ते एकरकमी खरेदी करण्याची तयारी आहे. केंद्राला विनंती आहे, लसीचा साठा उपलब्ध करून द्या. महाराष्ट्र चांगल्या गोष्टीत एक नंबरवर आहे. कोरोनामुक्तीतही एक नंबर होऊन दाखवू, असा दावाही त्यांनी केला.कालच उच्च न्यायालयाने सरकारला विचारलं आहे की, यापेक्षा कडक लॉकडाऊन लावण्याची गरज आहे का? मात्र मला वाटतं तशी गरज येणार नाही. ज्या वेगाने रुग्णवाढ होत होती त्याच वेगानं  आज १० लाख सक्रिय रुग्णसंख्या असती. मी जे बोललो ते आपण ऐकलं, निर्बंध घालणं अवघड होतं.

पण जी शक्यता होती ती रुग्णसंख्या आपण सहा ते साडेसहा लाखांपर्यंत स्थिरावून ठेवली आहे. राज्यासाठी गरजेचं असेल तर मी कुणाचंही अनुकरण करायला तयार आहे. यापेक्षा कडक निर्बंध लावायची गरज वाटत नाही. गेल्या वर्षी दोन प्रयोगशाळा होत्या,आता ६०० च्या आसपास  आहेत. लॉकडाऊन लावलंय पण हाताला लॉक लावून बसलेलो नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.महाराष्ट्रदिन आणि कामगारदिन एकाच दिवशी आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कामगार आणि शेतकरी दोन्ही उतरले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील सर्व हुतात्म्यांना मानाचा मुजरा. मागच्या वेळीसुद्धा  लॉकडाऊनच होता. यावेळीसुद्धा फारासा फरक नाहीये.  आपल्यामागे काय दुष्टचक्र लागलं आहे काय माहीत. २०१० चा महाराष्ट्रदिन मला आठवतो आहे. त्यावेळी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सवर लाखो लोक जमले होते. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे होते. संपूर्ण मंगेशकर कुटुंब होते. हेही दिवस जातील. नंतर पुन्हा झळाळीचे दिवस येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button