दिवसाला चार लाख लोकांना लस; सीताराम कुंटे यांची माहिती

Sitaram Kunte - Maharastra today
Sitaram Kunte - Maharastra today

मुंबई :- कोरोना प्रतिबंधक लसीकरणात महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. सध्या राज्यात दिवसाला चार लाख लोकांना लस दिली जात आहे, अशी माहिती मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिली. लसीकरणाचा वेग आणखी वाढू शकतो. त्या दृष्टीने केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला अधिकाधिक लसींचा पुरवठा होईल यासाठी प्रयत्न करू, असे सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी सांगितले.

कोरोना लसीबाबत नियोजन व समन्वय यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य सुकाणू समितीची मंगळवारी बैठक झाली. राज्यात आतापर्यंत ८२ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी.गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी सादरीकरण केले. महाराष्ट्राला आतापर्यंत लसीचे सुमारे १ कोटी ६ लाख डोसेस प्राप्त झाले आहेत. या पैकी ८८ लाख डोसेसचा वापर झाला आहे. महाराष्ट्रात डोस वाया जाण्याचे प्रमाण ३ टक्के आहे. ५ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात ८१ लाख २१ हजार ३३२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, असे डॉ. व्यास यांनी सांगितले.

औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ठाणे या सहा जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या जास्त आहे. येथे प्राधान्याने ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी यंत्रणेने प्रयत्न करावेत. लसीकरणाचा वेग पाहता शासनाकडून जास्तीचा पुरवठा होण्याकरिता पाठपुरावा करण्यात येईल, असे मुख्य सचिवांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button