जोशी मठजवळ हिमकडा कोसळला; धरण फुटले, १५० नागरिक बेपत्ता

- हरिद्वारपर्यंत सतर्कतेचा इशारा

Uttarakhand- Glacier collapse erupts Tapovan barrage, 150 missing

जोशी मठ :- उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील रैनीत असलेल्या जोशी मठ परिसरात रविवारी सकाळी हिमकडा कोसळला व धौलीगंगा नदीवरील ऋषिगंगा पॉवर प्रोजेक्टचे प्रचंड नुकसान झाले. धरण फुटल्याने धौलीगंगेच्या पाण्याची पातळी प्रचंड वाढली. अचानक पूर आल्याने नदीकाठावरील घरांना तडाखा बसला. १५० नागरिक बेपत्ता आहेत. हरिद्वारपर्यंत अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जोशी मठ येथे नुकसानीबाबत अद्याप माहिती हाती आली नाही. हिमकडा कोसळल्यानंतर धौलीगंगा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. पाण्याची प्रचंड मोठी लाट धरणात येताना दिसते. लाटेच्या तडाख्याने नदीवरील दोन पूल वाहून गेले. एसडीआरएफने मदतकार्य सुरू केले आहे.

पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी राज्य सरकारने जोशी मठजवळ हेलिकॉप्टर पाठवले आहे. केंद्राकडे एनडीआरएफच्या तुकड्या पाठवण्याची मागणी केली आहे. पुरामुळे नदीकाठावरील घरांना फटका बसला आहे.

चमोलीचे पोलीस अधीक्षक यशवंत सिंह चौहान यांनी स्थितीची माहिती देताना सांगितले की, बरेच नुकसान झाल्याची माहिती आहे. बचाव पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे.

ऋषिगंगासोबत अलकनंदा नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याची सूचना देण्यात आली आहे. अलकनंदा परिसरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अलकनंदा नदीला पूर येऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून भगीरथी नदीचा प्रवाह बंद करण्यात आला असून, एसडीआरएफला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी ही माहिती दिली. रावत घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER