उन्हाळ्यात उपयोगी रुचिकारक सरबत !

Summer - Maharastra Today
Summer - Maharastra Today

सूर्य तापायला लागला की पाणी पाणी जीव होतो. केवळ पाण्याने तहान शमन होत नाही व तृप्ती पण होत नाही. अशावेळी वेगवेगळी सरबते पन्हे घरोघरी बनतात. आजकाल कोल्ड्रींकने त्याची जागा घेतली आहे पण रासायनिक युक्त पेय घेण्यापेक्षा आपले पारंपारिक पेय पानक किती आरोग्याला हितकर आणि ग्रीष्मऋतुला सुसह्य करणारे ठरतात. आयुर्वेदात (Ayurveda) याला पानक, तर्पण म्हणतात. बघूया असे काही पानक

आम्रफल पानक – उकडलेल्या कैरीचा कोळ पाणी साखर याच्या मिश्रणाला थोडी मिरेपूड घालून सुगंधित केली जाते. हे पन्हे प्रत्येकाकडे तयार करतातच. हे पन्हे वात शामक असते. परंतु रोज घेतल्यास काहीसे कफपित्त वाढविणारे आहे. हे पन्हे पिकलेल्या आंब्याचे पण करतात. आंब्याचा रस काढून साखर विलायची लवंग किंचीत आल्याचा रस घालून सुगंधित करतात. असे रुचिकारक पन्हे सर्वांनाच आवडणारे आहे. हे पक्व आंब्याचे पन्हे थोडे पचायला जड, पित्तशामक, हृदयाला हितकर, वर्ण्य वृष्य असे सांगितले आहे.

अम्लिका फल पानक – पिकलेल्या चिंचेचे पानक. चिंचेला भिजवून त्याचा कोळ काढतात. त्यात पाणी साखर मिरेपूड लवंग चूर्ण घालून सुगंधित करतात. याचे गुण वर्णन बघूया –

अम्लिकाफलसंभूतं पानकं वातनाशनम् ।
कफपित्तकरं किंचित् सुरुच्यं वन्हिबोधकम् ॥

हे चिंचेचे सरबत वातशामक, थोडे पित्त वाढविणारे, रुचिकारक, जाठराग्निवर्धक आहे.

हेमकिरण पानक – नाव एकदम वेगळे पण करायला एकदम सोपे. साखर नारळ पाणी थोडेसे नींबू रस एकत्र केलेले हे हिमकिरण पानक.

पानकं हेमकिरणं रुच्यं वृष्यं बलप्रदम्
सुस्निग्धं वातहृच्छुभ्रं किञ्चित् कफकरं गुरु ॥

हे शुभ्र वर्णाचे पानक रुचिकारक, बलदायक, पचायला जड, वीर्यवर्धक आहे.

खर्जूर मंथ – काळ्या मनुका १५-२०, खजूर २, पाण्यात भिजवावे. यात अंजीर, फालसा हे देखील घालू शकतो. या सर्वांना कुस्करून पाणी घालून सरबता प्रमाणे तयार करावे. यात साखर घालण्याची गरज नाही. जीरे मिरे पूड चवीनुसार घालावे.

हे मंथ पोषक, अशक्तपणा दूर करणारे, मांसवर्धक, रक्तपित्ताचा नाश करणारे, रक्तवर्धक आहे.

असे हे विविध पानक, थोडे वेगळे पण ऋतुचा दुष्परिणाम कमी करणारे आहे. त्याचा प्रकृतीनुसार विचार करून नक्कीच समावेश करावा.

ह्या बातम्या पण वाचा : 

ayurveda

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button