सीमावादात अमेरिकेचे भारताला समर्थन

Donald Trump-PM Modi-xi jinping

भारत-चीन सीमावादात अमेरिकेने भारताला समर्थन दिले आहे. गुरुवारी व्हाईट हाऊसने आपल्या अहवालात म्हटले आहे की, चीन भारतासह त्याच्या शेजारी देशांमध्ये प्रक्षोभक लष्करी कारवाया करत असतो. चीनने भारताच्या सरहद्दीत केलेला घुसखारींचा प्रयत्न जगासाठी धोक्याचा इशारा आहे.

चीन यलो सी, ईस्ट – साऊथ चायना सी आणि भारत-चीन सीमेवर खोड्या करून शेजारी देशांबद्दलच्या व्यवहारांबाबतच्या मर्यादांचे उल्लंघन करतो आहे, अशी टीका व्हाईट हाऊसनेकेली आहे. ‘युनाइटेड स्टेट्स स्ट्रॅटेजिक अप्रोच टू द पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना’ हा अहवाल नुकताच अमेरिकेच्या काँग्रेसला सादर करण्यात आला आहे. त्यात या विषयावर मतप्रदर्शन करण्यात आले आहे.

यात म्हटले आहे की, चीनची ताकद  वाढली आहे. जगात सामरिकदृष्ट्या चीनसाठी धोका किंवा अडथळा ठरू शकणाऱ्या, बाधा दूर करण्यासाठी चीन ताकदीचा उपयोग करण्याकडे वाटचाल करतो आहे. चीनच्या या कारवाया चीनच्या नेत्यांच्या – आम्ही लष्करी ताकद वापरण्याच्या विरोधात आहोत. इतर देशांच्या आंतरिक बाबींमध्ये लक्ष घालत नाही आणि सर्व वाद चर्चेतून शांततेच्या मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न करतो, हे दावे पोकळ असल्याचे सिद्ध करतात.

चीनच्या आक्रमकतेला भारत करत असलेल्या विरोधाचे समर्थन करताना अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयातील दक्षिण- पश्चिम आशियाच्या धोरणाच्या प्रमुख एलिस वेल्स म्हणाल्या होत्या की, चीन, साऊथ चायना सी प्रदेशात सतत अतिक्रमण करून तेथील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो आहे. वेल्स पुढे म्हणाल्या की, चीनपासून धोका नाही असा ज्यांना भ्रम आहे त्यांनी भारताशी चर्चा करायला पाहिजे.

भारत सतत चीनच्या प्रक्षोभक कारवायांचा सामना करत असतो. चीनचे अतिक्रमण हा फार मोठा धोका आहे हे भारत-चीन सीमेवरचा तणाव पाहिला म्हणजे लक्षात येते. दक्षिण सागर असो किंवा भारत-चीन सीमा; सर्व ठिकाणी चीनच्या प्रक्षोभक कारवाया सुरू आहेत हे दिसते. हे सर्व पाहिल्यानंतर हा प्रश्न निर्माणहोतो की चीनला त्याच्या वाढत्या ताकदीचा उपयोग खास प्रकारे करायचा आहे? चीनच्या शेजारी देशांशी सुरू असलेल्या सीमावादाच्या धोक्याच्या संदर्भात वेल्स म्हणाल्या की – जगात चीनचे आधिपत्य असलेली वैश्विक व्यवस्था निर्माण व्हायला नको. ज्यात सर्वांचा फायदा असेल अशी व्यवस्था निर्माण व्हावी अशी अमेरिकेची इच्छा आहे.

चीनच्या प्रक्षोभक आणि त्रस्त करणाऱ्या कारवाईविरुद्ध अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया आणि ‘आसियान’मधील समविचारी देश एकत्र आले आहेत. चीनला रोखले पाहिजे, यावर सर्वांचे एकमत आहे असे वेल्स म्हणाल्या. व्हाईट हाऊसने म्हटले आहे की, चीनच्या विस्तारवादी धोरणाच्या विरोधात अमेरिका अनेक देशांना सोबत घेऊन काम करतो आहे.

हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटी रँकिंग मेंबर मेक थॉर्नबेरी म्हणाले की, हा अहवाल म्हणजे ट्रम्प प्रशासनाची चांगली सुरुवात आहे. हा अहवाल अमेरिकेच्या लष्करातील गुंतवणुकीचे महत्त्व अधोरेखित करण्यासोबत मित्र देशांशी असलेले संबंध दृढ करण्यावरही जोर देतो. सर्व शक्तींचा उपयोग करूनच आम्हीहिंद-प्रशांत आणि सर्व जगाला चीनच्या विस्तारवादी कारवायांपासून रोखू शकतो, असे मेक म्हणतात.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER