युएस ओपन आयोजकांनी टेनिसपटूंवर टाकला बॉम्बगोळा

US open

यूएस टेनिस असोसिएशन (USTA) यंदा कोरोनाच्या (Corona) साथीतही 31 ऑगस्टपासून न्यूयॉर्कमध्ये यूएस ओपन (US Open) या ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेचे आयोजन करत आहे. अमेरिकेत कोरोनाचा प्रकोप कायम असताना ही स्पर्धा होत आहे आणि त्यामुळे बहुतेक खेळाडूंनी आरोग्याच्या भीतीपायी या स्पर्धेत भाग घेणे टाळले आहे. त्यात राफेल नदाल (Rafel Nadal) , नीक किरयोस, स्टॅन वावरिंका, अॕशली बार्टी (Ashley Barty) अशा आघाडीच्या खेळाडूंचा समावेश आहे मात्र नोव्हाक जोकोवीच, डॉमिनीक थिएम, अॕलेक्झांडर झ्वेरेव, सेरेना विल्यम्स, सिमोना हालेप व बियांका आंद्रीस्कू असे खेळाडू सहभागी होणार आहेत.

युएस ओपनच्या आरोग्यविषयक अतिशय कडक नियमावली (Protocol) बद्दल जोकोवीचसह बऱ्याच खेळाडूंनी आधीच नाराजी व्यक्त केली आहे. पण आता युएस ओपन आयोजकांनी घेतलेल्या नव्या निर्णयाने खेळाडूंवर बॉम्बगोळाच टाकला आहे. या निर्णयानुसार युएस टेनिस असोसिएशनने या स्पर्धेत सहभागाची संपूर्ण जबाबदारी आता खेळाडूंवरच ढकलली आहे आणि त्यांच्याकडून तसे संमतीपत्रच (Waiver) लिहून घेतले जाणार आहे. या संमतीपत्रानुसार युएस ओपनमध्ये सहभागाने गंभीर आजार उद्भवल्यास किंवा प्रसंगी मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी आमची स्वतःची राहील असे खेळाडूंकडून लिहून घेण्यात येणार आहे. या संमतीपत्राने बहुसंख्य टेनिसपटूंची आता नक्कीच झोप उडाली असणार आणि यंदाच्या युएस ओपनमध्ये सहभागी व्हायचे की नाही याचा ते पूनर्विचार करू लागले असतील. विशेषतः कोरोना गांभिर्याने न घेणाऱ्या जोकोवीच कंपूच्या पायाखालील वाळू सरकली असेल.

जोकोवीचने आधीच युएस ओपनच्या ठिकाणी घालून दिलेल्या बंधनांवर नाराजी आधीच व्यक्त केली होती. त्यानंतर खेळाडूंसोबत प्रशिक्षक, फिजियो अशा मंडळींना परवानगी मिळाली आहे पण आता या संमतीपत्रासह युएसटीएने एक पाउल उलट मागे टाकले आहे.

युएसटीएला आयोजनातील किरकोळ त्रुटींचा आधी फटका बसला आहे म्हणून त्यांनी आता कोरोनामुळे आणखी काही विवाद उदभवू नये म्हणून हे पाऊल उचलले आहे. त्यानुसार त्यांनी पूर्ण जबाबदारीने खेळाडूंवर ढकलली आहे.

यासंदर्भात युएसटीए जे संमतीपत्र खेळाडूंकडून घेणार आहे त्यात म्हटले आहे, ” नॕशनल टेनिस सेंटर (NTC) येथील माझ्या उपस्थितीदरम्यान एनटीसीच्या निष्काळजीपणा वा दुर्लक्षामुळे वा इतर कारणांमुळे मला किंवा माझ्या संपर्कातील इतरांना काही हानी, इजा वा धोका (मृत्युसह) उद्भवल्यास त्याची जबाबदारी मी स्वेच्छेने स्विकारत आहे.” या संमतीपत्रात पुढे म्हटलेय ,” हे जबाबदारीचे करारपत्र असुन ते कायमसाठी वैध असेल याची मला जाणिव आहे. हे करारपत्र मी जिवंत असल्यास माझी पत्नी व कुटुंबाचे सदस्य आणि माझा मृत्यू झाल्यास माझे वारसदार, नमनिर्देशीत व्यक्ती व वैयक्तिक प्रतिनिधी यांना बांधील असेल. “

या प्रकारे युएटीएने युएस ओपनमध्ये खेळाडूंच्या सहभागाचा कोणताही धोका स्वतः पत्करलेला नसुन सर्व जबाबदारी खेळाडूंवर ढकलली आहे. त्यामुळे टेनिसपटूंच्या परिषदेचा अध्यक्ष असलेला नोव्हाक जोकोवीच आता काय भूमिका घेतो हे महत्त्वाचे ठरणार आहे. युएसटीएने या करारपत्राद्वारे स्वतः सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न तर केला आहेच शिवाय खेळाडूंना विम्याचा लाभ मिळण्याचे मार्गसुध्दा बंद केले आहेत. त्यामूळे व्यावसायिक टेनिसपटूंसाठी यंदाच्या युएस ओपनमध्ये सहभागी होणे अधिकच धोकादायक ठरले आहे आणि बहूसंख्य खेळाडू आता या स्पर्धेत सहभागी होण्याचे टाळतील असा अंदाज आहे.

दरम्यान, ब्रिटनची अव्वल महिला टेनिसपटू योहाना कोंटा ही या कोविड- 19 संमतीपत्राने चिंतीत नाही. ती म्हणते की आपल्या शरीराची काळजी घेणे आपल्याच हाती आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER