अमेरिकेची केकेआर करणार जीओत ११ हजार ३६७ कोटींची गुंतवणूक

- एक महिन्यात जीओचा पाचवा मोठा करार

US KKR to invest Rs 11367 crore in Jio

नवी दिल्ली : अमेरिकेतील खासगी इक्विटी कंपनी केकेआरने जीओत ११ हजार ३६७ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओने या गुंतवणुकीबद्दल माहिती दिली. केकेआर जिओमधील २.३२ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे.

कोणत्याही आशियाई कंपनीत केकेआरनं केलेली ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. जिओ प्लॅटफॉर्मची इक्विटी व्हॅल्यू ४.९१ लाख कोटी रूपये तर एन्टरप्राईझ व्हॅल्यू ५.१६ लाख कोटी रूपयांवर पोहोचली आहे. या गुंतवणुकीने रिलायन्स जिओमध्ये महिनाभरात ७८ हजार ५६२ कोटी रूपयांची गुंतवणूक झाली आहे. रिलायन्स जिओमध्ये महिन्याभरातली ही पाचवी गुंतवणूक आहे.

यापूर्वी रिलायन्स जिओमध्ये न्यूयॉर्कमधील खासगी इक्विटी कंपनी जनरल अटलांटिकने ६,५९८.३८ कोटी रूपयांची गुंतवणूक केल्याची घोषणा केली होती. जनरल अटलांटिक जिओ प्लॅटफॉर्ममधील १.३४ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. आशियाई कंपनीतील जनरल अटलांटिकची ही सर्वात मोठी गुंतवणूक असल्याचे सांगण्यात आले होते.

सर्वप्रथम फेसबुकने रिलायन्स जिओमध्ये ४३ हजार ५७४ कोटी रूपयांची गुंतवणूक करत ९.९९ टक्के हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली होती. फेसबुकच्या गुंतवणुकीनंतर टेक इन्व्हेस्टर कंपनी सिल्व्हरलेकनं ५,६६५.७५ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीतून जिओतील १.१५ टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विस्टा इक्विटी पार्टनर्सने जिओमधील २.३२ टक्के हिस्सा खरेदी केला होता. त्यांनी कंपनीत ११,३६७ कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती.

भारतीय डिजिटल इको प्रणालीत बदल करण्याच्या आमच्या प्रवासात केकेआर आमच्या सोबत असेल. हे सर्व भारतीयांसाठी फायदेशीर ठरणार आहे. महत्त्वपूर्ण भागीदार होण्याचा केकेआरचा ट्रॅक रेकॉर्ड विलक्षण आहे. केकेआरचे जागतिक व्यासपीठ, उद्योगांची माहिती आणि परिचालनाचं कौशल्य जिओच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण ठरेल,” अशी प्रतिक्रिया रिलायन्स जिओचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी दिली.

जिओमुळे डिजिटल क्रांती – केकेआर

देशातील डिजिटल इको प्रणाली बदलण्याची क्षमता ठराविक कंपन्यांकडे असते. जिओ त्यापैकीच एक आहे. जिओ एक असा स्वदेशी प्लॅटफॉर्म आहे जो भारतात डिजिटल क्रांती घडवत आहे. जिओचे जागतिक स्तरावरील इनोव्हेशन आणि उत्तम नेतृत्वामुळेच आम्ही कंपनीत गुंतवणूक करत आहोत, अशी माहिती केकेआरचे सहसंस्थापक हेनरी क्राविस यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला