भारतीय अभियंत्याला व्हिसा नाकारला; आयटी कंपनीचा अमेरिका सरकारवर खटला

US government denied Indian engineer's visa

वॉशिंग्टन : भारतीय अभियंत्याला एच-१बी व्हिसा नाकारल्याबद्दल सिलिकॉन व्हॅलीमधील आयटी कंपनी एक्सटेरा सोल्युशन्सने अमेरिका सरकारवर खटला दाखल केला आहे.

भारतीय अभियंता प्रकाशचंद्र साई व्यंकटा अनिसेट्टी याची एक्सटेरा सोल्युशन्सने बिझनेस सिस्टिम अनालिस्ट म्हणून कंपनीत नियुक्ती केली होती. मात्र यूएस सिटिझनशिप अ‍ॅण्ड इमिग्रेशन सर्व्हिसेसने  (यूएससीआयईएस) त्यांना एच-१ बी व्हिसा दिला नाही. व्हिसा कार्यालयाने व्हिसा नाकारताना ठोस पुरावे आणि कारणे दिली नाहीत, असा दावा कंपनीने केला आहे. तसेच व्हिसा नाकारण्याचा निर्णय हा मनमानी करणारा आणि विवेकबुद्धीचा वापर न करताच घेतलेला आहे, असे एक्सटेरा सोल्युशन्सच्या वकिलांनी म्हटले आहे.

‘प्रकाशचंद्र साई व्यंकटा अनिसेट्टी हे एच-१बी व्हिसा अंतर्गत काम करण्यास योग्य नाहीत’ एवढेच अमेरिकन सरकारने म्हटले आहे, असे सांगत कंपनीने नॉर्दन डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्निया यूएस डिस्ट्रिक्ट कोर्टाला यूएससीआयईएसचा निर्णय रद्द ठरवण्याची मागणी केली आहे.

प्रकाशचंद्र साई हे इलेक्ट्रॉनिक अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशनमधील बी.टेक. पदवीधारक आहेत. त्यांनी डलास येथून टेक्सास विद्यापीठातील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर पदवी घेतली आहे. त्यांच्याकडे सध्या एच-४ व्हिसा आहे.