
असे मानले जाते की, खेळाडूंची कारकीर्द पस्तिशीनंतर उतरणीला लागते; पण याला अपवादसुद्धा बरेच खेळाडू आहेत. रॉजर फेडरर, सेरेना विल्यम्स व व्हिनस विल्यम्स या अपवादाचे उत्तम उदाहरण आहेत. वयाच्या पन्नाशीत पोहचलेला कुणी खेळाडू जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १०० खेळाडूंमध्ये स्थान मिळवत असेल तर त्यावर विश्वास ठेवणे तसे अवघडच!
फोर्बसने गेल्या १२ महिन्यांतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या आघाडीच्या १०० खेळाडूंची जी यादी जाहीर केली त्यामध्ये ४० वर्षांपेक्षा अधिक वयाचे चार खेळाडू आहेत. यात सर्वाधिक वयाचा आहे अमेरिकन गोल्फपटू फिल मिकेलसन आणि त्याचे वय आहे ५०. पुढच्याच महिन्यात तो वयाचे अर्धशतक पूर्ण करणार आहे; पण या खेळाडूची गेल्या जूनपासूनची कमाई आहे तब्बल ४ कोटी ८ लाख अमेरिकन डॉलर. आपल्या ३१ वर्षांच्या तरुण विराट कोहलीपेक्षा जवळपास दीड कोटी डॉलर जादाच. विराटची कमाई २ कोटी ६० लाख डॉलर आहे. फिल मिकेलसनच्या कमाईतील ८० लाख डॉलर फक्त वेतन वा मानधनातून आहे आणि उर्वरित कमाई जाहिराती व प्रायोजकत्वातून आहे.
ही बातमी पण वाचा : लॉकडाऊननंतर विराट कोहलीचे लक्ष असणार सचिनच्या विक्रमांवर !
फोर्ब्सच्या ताज्या यादीत २१ व्या स्थानी असलेला अमेरिकन फुटबॉलचा अमेरिकन खेळाडू टॉम ब्रॅडीचे वय आहे ४२ वर्षे आणि त्याची वार्षिक कमाई आहे साडेचार कोटी डॉलर. यादीतील २२ व्या स्थानावरील अमेरिकेचाच अमेरिकन फुटबॉलपटू ड्रुयू ब्रीस हा ४१ वर्षांचा. त्याची कमाई आहे ४ कोटी ४८ लाख डॉलर आणि दीर्घकाळानंतर पुनरागमन केलेला प्रसिद्ध अमेरिकन गोल्फपटू टायगर वूडस याने आपला करिश्मा अजूनही कायम राखला आहे. ४४ वर्षे वयातही त्याने ६ कोटी २३ लाख कमावून फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये आठवे स्थान मिळवले आहे.
सर्वाधिक वयाच्या खेळाडूंनी जसे हे कमाईचे झेंडे गाडले तसे कमी वयातही भरघोस कमाई करणारे खेळाडूसुद्धा आहेत. त्यात आघाडीचे नाव आहे एनबीएचा बास्केटबॉल स्टार झियान विल्यमसनचे. अजूनही २० वर्षेसुद्धा वय नसलेल्या या खेळाडूने गेल्या वर्षभरात २ कोटी ७३ लाख डॉलर कमावले आहेत.
सर्वाधिक कमाईच्या खेळाडूंच्या यादीत ५७ व्या स्थानी असलेला हा खेळाडू आपला विसावा वाढदिवस यंदा जुलैमध्ये साजरा करणार आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला