मतदानापूर्वी अमेरिका करू शकतो क्षेपणास्त्र हल्ला; चीनला वाटते भीती

बीजिंग : दक्षिण चीन समुद्रात तैवानसोबत सुरू असलेल्या वादात हस्तक्षेप करून अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या मतदानापूर्वी तैवानच्या बाजूने दक्षिण चीन समुद्रातील बेटांवर क्षेपणास्त्र हल्ला करू शकतो, अशी भीती चीनला (China) वाटते आहे.
चीन सरकारचे वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’चे संपादक हू शिजीन यांनी हा दावा केला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा विजयी होण्यासाठी ट्रम्प हे पाऊल उचलू शकतात, असा दावा त्यांनी केला आहे.

शिजीन यांनी ट्विट करून म्हटले की, मला मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) निवडणुकीत विजयी होण्यासाठी दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या बेटांवर MQ-9 रीपर ड्रोनने क्षेपणास्त्र हल्ला करू शकतात. अमेरिकेने हल्ला केल्यास चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान जोरदार प्रतिहल्ला करून यु्द्ध छेडणाऱ्यांना धडा शिकवतील असेही त्यांनी म्हटले आहे.

तैवानच्या मुद्यावर चीन आणि अमेरिकेतील तणाव वाढतो आहे. याआधी अमेरिकन सैन्य तैवानमध्ये पुन्हा शिरल्यास चीन युद्ध छेडणार असल्याची धमकी ‘ग्लोबल टाइम्स’ने दिली होती.

…तर अमेरिका-चीन करार निघणार मोडीत

तैवानमध्ये अमेरिकेने सैन्य पाठवल्यास चीनकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे ग्लोबल टाइम्सने विश्लेषकांच्या हवाल्याने म्हटले आहे. अमेरिकेने सैन्य पाठवल्यास चीन आणि अमेरिकेत झालेला करार मोडीत निघेल. अमेरिकेने सैन्य तैवानमध्ये दाखल करण्याचा प्रस्ताव हा तैवानच्या नागरिकांविरोधात आहे, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. अमेरिकन सैन्य तैवानमध्ये शिरल्यास चीन कारवाई करेल आणि ताकदीच्या बळावर तैवानचे चीनमध्ये विलनीकरण करेल, अशी धमकी ग्लोबल टाइम्सने दिली आहे.

चीन विरोधात भारत-जपान एकत्र

आशिया खंडात चीनच्या वाढत्या दादागिरीला आळा घालण्यासाठी भारत आणि जपान यांच्यातील संबंध आणखी दृढ होत आहेत. चीनला वेसण घालण्यासाठी भारत आणि जपान एकत्र येणार असून जपानचे पंतप्रधान सुगा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काही दिवसांपूर्वीच फोनवरून चर्चा केली. दोन्ही देशांतील आर्थिक आणि लष्करी संबंध आणखी दृढ करण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.

जपानच्या पंतप्रधानांनी क्वाडची सूचना केली आहे. इंडो-पॅसिफिक भागासाठी भारत-जपान-ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत परस्पर सहकार्य वाढवण्याची आवश्यकता असल्याचे सुगा यांनी म्हटले आहे. या चारही देशांनी चीनविरोधात ‘क्वाड’ बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER