उपेंद्रचा नवीन अंदाज लवकरच

Upendra Limaye

पडद्यावर काही अभिनेते हे त्यांच्या राकट भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. अभिनेता म्हटलं की त्याला कुठलीही भूमिका तितक्याच ताकदीने करावी लागते. चेहऱ्यावरची रेषही हलू न देता कठोर भूमिका करणाऱ्या अनेक अभिनेत्यांना ऑनस्क्रिन रोमान्सही करावा लागतो. खरेतर हीच त्यांच्या अभिनयाची ताकद असते. त्यामुळे जेव्हा अशा कलाकारांना त्यांच्या नेहमीच्या भूमिकेपेक्षा हटके भूमिकेत बघताना त्यांचे चाहतेदेखील सुखावून जातात. अशीच एक मेजवानी अभिनेता उपेंद्र लिमये याच्या चाहत्यांना मिळणार आहे. उपेन्‍द्र त्याच्या विशिष्ट आवाजासाठी आणि धीरगंभीर भूमिकांसाठी ओळखला जातो. पण आता प्रीतम नावाच्या सिनेमात तो एक हळवा गायक म्हणून त्याच्या चाहत्यांना पडद्यावर दिसणार आहे. अर्थातच या भूमिकेसाठी उपेंद्रनेदेखील प्रचंड तयारी केली आहे. इतकेच नव्हे तर त्याने हार्मोनियम वाजवण्याचं खास प्रशिक्षणही या भूमिकेसाठी घेतलं आहे. आता जेव्हा हा सिनेमा पडद्यावर येईल तेव्हा एका वेगळ्या व्यक्तिरेखेचे सूर उपेंद्रला कितपत गवसले आहेत हे नक्कीच दिसेल. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या या अभिनयातील नव्या रूपाचं स्वागत केलं आहे.

जोगवा या सिनेमातील उपेंद्र लिमयेची तायाप्पा ही भूमिका इतकी गाजली की हा सिनेमा त्याला राष्ट्रीय पुरस्कार देऊन गेला.

समाजातल्या एका वेगळ्या विषयावर भाष्य करणाऱ्या जोगवा सिनेमात त्याची मुक्ता बर्वेसोबत चांगलीच जोडी जमली. जोगत्यांच्या मनात असलेल्या प्रेम भावनेला हळुवार फुंकर घालणाऱ्या या सिनेमात काही सीनमध्ये उपेंद्रने त्याच्या रोमँटिक अंदाजाची जादू दाखवली होती. पण त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये व मालिकांमध्ये उपेंद्र हा नेहमीच रोखठोक भूमिकांमध्ये दिसला. तरीही त्याच्यावर प्रेम करणारा त्याचा असा खास चाहता वर्ग आहे. गेल्या बर्‍याच दिवसांपासून उपेंद्र स्क्रीनपासून लांब होता. त्याची कुठलीच मालिका किंवा सिनेमा झळकला नव्हता. त्यामुळे त्याचे चाहते तो कधी पडद्यावर येतोय आणि नव्या भूमिकेत त्याला पाहायला मिळतं याची वाट बघत होते. आता ही प्रतीक्षा संपून उपेंद्र लवकरच आलाप आणि ताना घेणाऱ्या एका गायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

पावलो म्हसोबा रे’ ‘धावलो पिसोबा रे’ असे बोल असलेलं ‘प्रीतम’ चित्रपटातील भन्नाट गाणं अभिनेता उपेंद्र लिमयेवर चित्रित झालं आहे. हे गाणं मस्त जमलं असून शब्द सुरांचा भन्नाट मिलाफ हे या गाण्याचं वेगळेपण म्हणता येईल. या गाण्यातून कोकणातल्या संस्कृतीच दर्शन घडवतानाच प्रेमाचा व आपुलकीचा रंगही जाणवणार आहे. उपेंद्र याचं हे गाणं प्रेक्षकांचं दिलखुलास मनोरंजन करणार आहे.

सूर सपाटा, धग या सिनेमात उपेंद्र लिमये (Upendra Limaye) च्या व्यक्तिरेखा ही त्याच्या अभिनयातील चोखंदळपणाची साक्ष देते. खर्जातला आवाज आणि चेहऱ्यावरचे गंभीर भाव यामुळे नेहमीच त्याला एका वेगळ्या धाटणीच्या भूमिका सतत मिळत असतात. पण एक कलाकार म्हणून उपेंद्र नेहमीच नव्या भूमिकेच्या शोधात असतो.

उपेंद्र सांगतो की कलाकार म्हणून मला प्रीतम या सिनेमात काम करत असताना एका गायकाच्या बारकाव्यांचा अभ्यास करायचा होता. शिवाय प्रीतम या सिनेमात माझ्या हातात हार्मोनियम असते. गायक कलाकाराचा हात कशा पद्धतीने सराईतपणे त्या काळ्यापांढर्‍या बटनांवर फिरत असतो हे मला दाखवायचं होतं यासाठी मी हार्मोनियम वाजवणाऱ्या कलाकारांची भेट घेऊन त्यांच्या देहबोलीचा विशेष अभ्यास केला. याचा उपयोग मला ऑनस्क्रीन हार्मोनियम वाजवताना मी कसा दिसलो पाहिजे, माझा वावर किती सहज असला पाहिजे यासाठी झाला. गाणं म्हणत असताना गायकाचं लक्ष हे पूर्णपणे त्याच्या सुरांकडे असतं आणि त्याची बोटं हार्मोनिअमवर फिरत असतात. त्यामुळे ती सहजता माझ्या वावरणा-यामध्ये आली पाहिजे यासाठी मी हा सगळा प्रपंच मांडला. आणि मला हे सगळं ऐकताना खूप मजा आली. गुरुपौर्णिमा या सिनेमात मी सई ताम्हणकर सोबत नायकाची भूमिका केली होती. ती एक रोमँटिक लव्ह स्टोरी होती त्यामुळे तो रोल मला जमेल की नाही असं मला वाटत होतं. माझ्या चाहत्यांमध्ये नेहमी हा प्रश्न असतो की मी रोमँटिक नायक म्हणून किती शोभून दिसेल. पण हो, प्रत्येक अभिनेत्याची वेगळीच जातकुळी असते. आणि प्रेम हे नेहमी रोमँटिक असतं असं नाही तर अनेकदा कठोरपणातही प्रेम असू शकतं. मला वाटते की माझा अभिनय प्रेमाची वेगळी भाषा सांगणारा आहे. प्रीतम या सिनेमातही मी नेहमीपेक्षा नक्कीच वेगळा दिसेन. मलादेखील या सिनेमाची खूप उत्सुकता आहे जितकी चाहत्यांना आहे. मी फार सोशल मीडियावर ऍक्टिव्ह नसतो पण चाहत्यांच्या प्रतिक्रिया आणि प्रेक्षकांचं प्रेम मला वेगळ्या मार्गाने मिळत असते. त्याच प्रेक्षकांसाठी आणि माझ्या चाहत्यांसाठी नवीन काहीतरी दिले पाहिजे याच विचाराने मी प्रीतम हा सिनेमा घेऊन येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER