अन ‘तो’ ओव्हर थ्रोच्या सहा धावांचा निर्णय चुकीचाच : सायमन टॉफेल

Simon Taufel Umpire england

इंग्लंड :- क्रिकेटची पंढरी म्हणवल्या जाणाऱ्या इंग्लंडच्या लॉर्डस क्रिकेट मैदानावर अतिशय रोमांचक अशा अंतीम सामन्यामध्ये इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय मिळवत पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी घातली खरी मात्र आता यावर वादंग उठले आहे. टाय झाल्यानंतर दिलेल्या सुपर ओव्हरमध्ये यजमान इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागावा यासाठी पंचानी पुरेपूर प्रयत्न केल्याचा आता आरोप होत आहे. ओव्हर थ्रोच्या सहा धावांमुळेच इंग्लंडचा विजय झाला. मात्र पंचांचा हा निर्णय चुकीचा असल्याचा ठपका आंतरराष्ट्रीय निवृत्त पंच सायमन टॉफल यांनी ठेवला आहे.

ही बातमी पण वाचा : जोफ्रा आर्चरने वर्ल्डकपबद्दल चार वर्षांपूर्वी केली होती भविष्यवाणी !

विश्वचषक स्पर्धेमध्ये ४४ वर्षांनंतर प्रथमच इंग्लंडने जेतेपदावर नाव कोरण्याचा पराक्रम अंतीम सामन्यामध्ये केला. शेवटच्या अर्ध्या तासामध्ये सामन्याला अनेक कलाटणी देणाऱ्या घडामोडी मैदानात घडल्या. त्यातील सर्वात महत्वाची आणि वादग्रस्त ठरलेली घटना म्हणजे दोन धावांच्या प्रयत्नात असताना इंग्लंडला ओव्हर थ्रोच्या चार अशा एकूण सहा धावा देण्यात आल्या. अनेकांनी पंचांच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली असतानाच आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील नावाजलेले निवृत्त पंच आणि क्रिकेट नियमांसंदर्भातील गटाचे सदस्य असणाऱ्या सायमन टॉफल यांनी मैदानातील पंचांनी सहा धावांचा दिलेला निर्णय नियमांनुसार चुकीचा असल्याचे मत व्यक्त केले आहे.

शेवटच्या षटकात इंग्लंडकडून बेन स्ट्रोक्स आणि अदिल रशीद फलंदाजी करत होते. तीन चेंडूत ९ धावांची गरज असताना स्ट्रोक्सने मिड-विकेटला मारलेला फटका गप्टिलकडे गेला. त्याने चेंडू उचलून फेकेपर्यंत स्ट्रोक्स आणि रशीदने एकमेकांना क्रॉस केले नव्हते. त्यामुळे ओव्हर थ्रोच्या धावा मोजल्यास दुसरी धाव मोजणे नियमांमध्ये बसत नाही. नियमांनुसार ओव्हर थ्रोच्या धावा दिसल्यास धावलेली एक धाव आणि चौकार असा पाच धावा ग्राह्य धरणे अपेक्षित होते. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे नियमांनुसार ओव्हर थ्रोच्या पाच धावा मोजल्यास स्ट्रोक्स ऐवजी रशीदने फलंदाजी करणे अपेक्षित होते. म्हणजेच नियमांनुसार एक धाव वाचण्याबरोबरच स्ट्रोक्सऐवजी रशीद फलंदाजीला आला असता तर न्यूझीलंड सामना जिंकण्याची शक्यता अधिक होती. ‘मैदानावरील पंचांकडून चूक झाल्याचे स्पष्ट होत आहे. निर्णय घेण्यात मैदानावरील पंच चुकले. इंग्लंडला पाच धावा देणे अपेक्षित होते. मैदानावरील गोंधळामध्ये दुसरी धाव घेताना फलंदाजांनी एकमेकांना गप्टिलने चेंडू उचलून थ्रो करण्याआधीच क्रॉस केल्याचे पंचांना वाटले असणार. अर्थात पंचांचा हा अंदाज चुकल्याचे टीव्हीवरील ऍक्शन रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसत आहे,’ असे मत सायमन टॉफल यांनी व्यक्त केले.

आयसीसीचा नियम
आयसीसीच्या नियमांमध्ये १९.८ कलमात ओव्हर थ्रो किंवा खेळाडूच्या कृतीने अतिरिक्त धावा देण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे आहेत. जर ओव्हर थ्रो किंवा खेळाडूच्या कृतीमुळे अतिरिक्त धावा देण्यात येत असतील तर श्रेत्ररक्षकाने चेंडू उचलून तो यष्ट्यांकडे फेकेपर्यंत दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना क्रॉस करणे गरजेचे असते. म्हणजेच ओव्हर थ्रोच्या धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला देताना दोन्ही फलंदाजांनी धाव घेण्याच्या प्रयत्नात एकमेकांना क्रॉस केले तरच ओव्हर थ्रोच्या धावा ग्राह्य धरल्या जातात, असा नियम आहे. मुळचे श्रीलंकेचे असणारे मैदानावरील पंच कुमार धर्मसेना यांनी सहा धावा बहाल केल्या. मात्र आयसीसीच्या नियमांनुसार हा निर्णय चुकीचा आहे, पंचांवर कारवाई व्हावी असेही सायमन टॉफल माध्यमांशी बोलताना म्हणाले.