अवकाळी पावसाने ऊस तोडणी मंदावली

Heavy Rain - Sugarcane
Representative Image

कोल्हापूर : राज्यात ऊस (Sugarcane) पट्ट्यात बहुतांशी भागात पावसाने चार- पाच दिवस हजेरी लावली. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला आर्थिक फटका बसला आहे. अनेक ठिकाणी ऊस तोडण्या ठप्प झाल्या असून साखर कारखान्यांचे अर्थकारण अवकाळी पावसाच्या (Heavy Rains) चिखलात अडकले आहे.

साखर कारखान्यांचा गळीत हंगाम ऐन मध्यावर आला आहे. सर्व साखर कारखान्याचे ऊस गाळप वेगाने सुरू आहे. साखर कारखान्यानी कमीत कमी ५३ दिवस व सर्वाधिक ७० दिवस गाळप केले आहे. गाळपाचे हजेरी उद्दिष्टपूर्ण करण्यासाठी कारखान्याची धावपळ सुरू असतानाच गेल्या चार-पाच दिवसांत विविध भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम कारखान्याच्या गळीत हंगामावर झाला आहे. उसाच्या सऱ्यांमध्ये पाणी तुंबल्यामुळे शेतकरी तोडणी घेण्यास तयार नाहीत. चिखलात ऊसतोड केल्यास पुढील उत्पादन खोडवे व निडव्याची उगवण व्यवस्थित होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तोडण्या थांबवणे पसंद केले आहे.

कारखान्यांचा गेल्या वर्षीचा हंगाम सुरळीत पार पडला होता. मात्र, यंदा अवकाळी पावसामुळे साखर कारखान्यांचा हंगाम किमान आठ ते दहा दिवस लांबणार आहे. अंतिम टप्प्यात तर हंगाम कमालीचा मंदावतो. परिणामी कमी क्षमतेने गाळप करावे लागते. त्यामुळे हंगाम लांबून कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार आहे. अवकाळीच्या दणक्याने साखर उतारा किंचित घटला तरी कारखान्याना प्रतिटन साठ ते शंभर फटका बसणार आहे. कारखान्याबरोबरच ऊस तोडणी मजुराचे अवकाळीमुळे हाल होऊ लागले आहे. अनेक ठिकाणी मजुरांच्या टोळ्या बसूनच आहेत. तोडणीचा प्रश्न निर्माण झाल्याने वाहनधारकांनाही आर्थिक फटका बसणार आहे.

अनेक ठिकाणी तोडलेला ऊस शेतातच पडला आहे. बहुतांशी कारखान्यांनी रस्त्याकडेचा ऊस तोडून हंगाम चालू ठेवण्याची धडपड चालवली आहे. साखर उत्पादनासाठी लागणारा बगॅस, लाकूड, इंधने व अन्य घटकांचा खर्चही कायम राहतो. परिणामी गाळप कमी क्षमतेने झाले. तरी उत्पादन खर्चाचा भुर्दंड कारखान्यांना सोसावा लागत आहे. साखर उत्पादनाच्या साखळीचे लक्ष पाऊस कधी थांबणार याकडे लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER