रावसाहेब दानवेंना पराभूत केल्याशिवाय भांग पाडणार नाही : आमदार अब्दुल सत्तार

जळगाव : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना येत्या लोकसभा निवडणुकीत किमान 1 लाख मतांनी पारभव केल्याशिवाय भांग पाडणार नाही, अशी प्रतिज्ञा आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसच्या बैठकीत जाहीर केली. येत्या लोकसभा निवडणुकीत दानवे एके दानवे, एवढेच आपले ध्येय राहणार असल्याचे ते म्हणाले.

जळगाव मनपा निवडणूक लढताना स्थानिक नेत्यांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता होती असे सांगताना ते म्हणाले, नेता कसा आत्मविश्वासाने भरलेला असावा याचे उदाहरण देण्यासाठी आमदार सत्तार यांनी स्वत:च्या भीष्मप्रतिज्ञेचा उल्लेख केला.

सर्वत्र भाजपाची सत्ता असताना मी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांचा 1 लाख मतांनी पराभव करण्याची प्रतिज्ञा केल्याचे ते म्हणाले. यामुळे लोक मला वेड्यात काढत असताना मी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना 1 लाख मतांनी पराभव करण्याची प्रतिज्ञा केली असून ती पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले. गेल्या दहा महिन्यांपासून मी डोक्यावर केसच उगवू नये म्हणून दर पंधरवाड्याला हजामत करीत असून डोक्यावर गांधी टोपी घालत असल्याचे ते म्हणाले.