नागपूर जिल्ह्यात १३ हजार हेक्टरवरील कापूस नष्ट ; एकूण २२ हजार हेक्टर शेतीचे नुकसान

Unseasonal rains destroy 13 thousand hectare of cotton crop in Nagpur district

नागपूर :- नागपूर जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तब्बल १३ हजार हेक्टरवरील कापूस पीक नष्ट झाले आहे. एकूण २२ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नागपूर जिल्ह्यातील सर्वच १३ तालुक्यांमध्ये काल गुरुवारी अवकाळी पाऊस झाला.  ११६ गावांमध्ये  गारपीट झाली असून, २२ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीला तडाखा बसल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज शुक्रवारी सांगितले.

ही बातमी पण वाचा : धक्कादायक; राज्यात गेल्या नोव्हेंबर महिन्यात ३०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नागपूर जिल्ह्यातील ११६ गावांमधील शेती अक्षरश: भुईसपाट झाली असल्याचे एका खाजगी मराठी वृत्तवाहिनीने आज म्हटले आहे. यानुसार, सर्वाधिक नुकसान कापसाचे झाले आहे. त्यापाठोपाठ चार हजार हेक्टर क्षेत्रातील संत्रा आणि मोसंबी या फळपिकांचे आणि तीन हजार हेक्टरवरील तूर पिकाचे नुकसान झाले आहे. विदर्भातील वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांतील  काही भागांत गुरुवारी गारपीट झाली. रब्बी पिकांना त्याचा मोठा फटका बसला. आज शुक्रवारीही पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

दरम्यान, नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २५ हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज भाजपा कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची भेट घेतली. तातडीने सर्वेक्षण सुरू करून हे सर्वेक्षण ग्रामसभेला आणि स्थानिक लोकांना कळविण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे किमान ५० हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचा दावा यावेळी बावनकुळे यांनी केला.

शेतकऱ्यांची चिंता वाढली; गारपिटीने संत्रा आणि इतर पिकांचे मोठे नुकसान