नाशिक महापालिकेत भाजप नगरसेवकांचा अभूतपूर्व गोंधळ, अंतर्गत कलह समोर

Nashik Mahanagar Palika

नाशिक: नाशिक महापालिकेमध्ये आज अभूतपूर्व गोंधळ पाहण्यास मिळाला. महापालिकेच्या स्थायी समितीच्या आठ सदस्य निवडीवरून भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात आज राडा झाला. सत्ता आणि पद याचा वाद वाढल्याने भाजपातील अंतर्गत कलह आज चव्हाट्यावर आला. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नगरसेविका प्रियांका घाटे यांच्या समर्थकांनी गोंधक घालत पक्षाकडे राजीनामा दिला तर शिवसेनेत पूनम मोगरे यांना संधी न मिळाल्याने त्यांच्याही सदस्यांनी गोंधळ घातला.

भाजपकडून हेमंत शेट्टी, सुप्रिया खोडे, वर्षा भालेराव, शिवसेनेकडून सत्यभामा गाडेकर आणि सुधाकर बडगुजर तर काँग्रेसकडून राहुल दिवे तसेच राष्ट्रवादीकडून समीना मेमन यांच्या नावांची घोषणा केली. मात्र, संख्याबळाच्या आधारावर 3 सदस्य असावे या मागणीवर शिवसेना आग्रही होती. आता नाराज शिवसेना,या निवडीला कोर्टात खेचणार आहे.

स्थायी समितीचे आठ सदस्य 29 फेब्रुवारीला निवृत्त होत असून त्यांच्या जागी 8 नवे सदस्य नियुक्त करण्यासाठी विशेष महासभा आज महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली खाली झाली. यावेळी हा गोंधळ झाला.

प्रियांका घाटे यांच्या समर्थकांनी उमेदवारी न मिळाल्याने सभागृहाबाहेर गोंधळ घालत विशिष्ट समाजाला डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, या गोंधळामुळे महापौर सतीश कुलकर्णी यांनी सदस्य नियुक्त केले आणि तत्काळ सभा संपविली. यानंतर घाटे समर्थक रामायण या महापौर निवासस्थानी ठाण मांडून बसले.

प्रियांका घाटे यांची नाराजी तात्पुरती दूर करण्यात महापौर सतीश कुलकर्णी यांना यश आले असले तरी पुन्हा संघर्ष पेटणार असल्याचे दिसत आहे.