अभूतपूर्व दैना आणि एक छोटेसे पाऊल…

Pune Rain

Shailendra Paranjapeकमी दाबाच्या पट्ट्याच्या परिणामस्वरूप पुण्यासह राज्यभर पावसानं हाहाःकार माजवला. पुण्यामधे तर जनजीवन केवळ विस्कळीत झाले असे नाही तर शहराच्या सर्व भागात घराघरांमधे शिरलेल्या पाण्यामुळे नागरिकांची भिस्त केवळ आणि केवळ निसर्गावरच होती. म्हणजे असे की पाऊस थांबला की आपसूक जे काही भलं होईल ते होईल, अशीच खूणगाठ बहुतेकांनी बांधली होती.

अभूतपूर्व अशा म्हणजे दोन तासातल्या सत्तर ऐंशी मिलीमीटर पावसामुळं अर्बन प्लानिंग किंवा शहरी नियोजनाची लक्तरं वेशीवर टांगली. महाराष्ट्रामधे जवळपास पन्नास टक्क्यांपर्यंत (४८ टक्के) अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण झाले आहे. ते वाढतच आहे. त्यामुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी कमी असल्याने शहरांकडे येणारे लोंढे वाढत आहेत.

पुण्यामधे १९७०च्या दशकापर्यंत लोकसंख्येच्या दृष्टीनं आणि मूळ पुणेरी लोकांच्या प्रमाणाचा विचार करता पुणेपण टिकून होतं. मात्र, १९८०च्या दशकात आणि नंतर प्रत्येक दशकात पुण्याची डेमोग्राफी म्हणजे एकूण लोकसंख्येत असलेले विविध प्रकारच्या लोकांचे प्रमाण आमूलाग्र बदलले.

आधी अटोमोबाईलचे क्षेत्रं, मग खासगी व्यावसायिक महाविद्यालये, त्यानंतरच्या काळात आयटी किंवा माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातली वाढ या कारणांमुळं पूर्वी निवृत्तांना सुखानं राहण्यासाठीचं शहर याऐवजी देशातलं सर्वाधिक दुचाकी गाड्या असलेलं शहर. त्याबरोबरच शक्य तो नियम धाब्यावर बसवून त्या दुचाक्या दामटण्याचा जन्मसिद्ध अधिकार असलेल्यांचं शहर, हा लौकिक कायम राखताना मूळ पुणेकरांबरोबरच हा सद्गुण पुण्याबाहेरून आलेल्या एमएच१२ नसलेल्या गाड्यांचे चालकही अंगी बाणवताना दिसतात.

मूळ स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे रेल्वे स्थानक या त्रिकोणातल्या शहराबाहेर १९७० च्या दशकानंतर शहर वाढू लागलं. त्यातून कॉक्रीटचं जंगल उभं राहू लागलं आणि कोथरूड, धनकवडी, येरवडा-टिंगरेनगर, वाघोली अशा सर्व भागात सर्व दिशांना पुणे शहर वाढू लागलं. आता तर लोक तळेगावपर्यंत सदनिका घेऊन राहू लागलेत. हिंजवडी बालेवाडीपर्यंत तर ते जाताताच. शिरवळ, शिरूरपर्यंत सदनिकात राहून पुण्यात नोकरीला येणारेही पुण्यात राहतो असं सांगतात.

या सर्व गोष्टींमुळे, बांधकामांच्या रेट्यामुळं शहरातल्या ओढ्या नाल्यांची कुचंबणा झाली. लोकसंख्या प्रचंड वाढूनही गटारं, सांडपाणी यंत्रणा पूर्वीइतकीचराहिल्यानं तकलादू ठरू लागलीय. त्यामुळं एकीकडं टोलेजंग इमारती आणि दुसरीकडे झोपडपट्ट्या हे महानगरांमधलं व्यवच्छेदक लक्षण पुण्यातही दिसू लागलंय. त्यातून अँबनॉर्मल किंवा नेहमीपेक्षा जास्ती पाऊस झाला की महापालिका आणि एकूणच सरकारी यंत्रणांच्या मर्यादा स्पष्ट होतात. तेच बुधवारी रात्री घडलं.

करोनापासून जीव वाचवताना जसं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हा मंत्र आहे तसंच अतिवृष्टीसारख्या आणि त्यातून उद्भवणाऱ्या मानवनिर्मित पूरस्थितीच्या संकटातून स्वतःला वाचवण्याचं कसबही पुण्यात रहायचं असेल तर शिकून घ्यावं लागेल. कमी दाबाचा पट्टा जरी नैसर्गिक असला तरी शहरातली बेकायदा बांधकामं, त्यामुळे झालेला ओढे नाल्यांचा संकोच, नदीतल्या नगण्य पाणीप्रवाहाचे नियमित होत असलेले प्रदूषण हे सारं मानवनिर्मितच आहे.
पुण्यामुंबईत राहणाऱ्यांना सीझनमधे अशा एखाद्या अभूतपूर्व पावसाची किंवा परिस्थितीची सवय करून घ्यावी लागणार, यात शंका नाही. कारण सरकार, प्रशासन, पालिका किंवा अन्य कोणतीच यंत्रणा नियमानुसार सारे कर भरणाऱ्यांसाठी काही करू शकेल, हा विश्वास आता उरलेला नाही.

पुण्याची बुधवारी रात्री झालेली दैना अभूतपूर्व अशीच होती. त्यात फारशी सुधारणा होईल, अशी चिन्हं नाहीत. त्यामुळे शहराच्या सर्व भागांमधून नगरसेवक, आमदार, खासदार असे सगळे कसोटीच्या क्षणी गायब होतात, हे पुन्हा दिसून आले. करोनाकाळातही तेच घडलं होतं. त्यामुळे आपापले जीव वाचवतानाच सरकारला, महापालिकेला उत्तरदायी बनवण्यासाठीचे उपायही कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांनाच करावे लागणार आहेत.

करोनाची आपल्याबरोबर राहण्याची तयारी आहे की नाही, हा प्रशनच अप्रस्तुत आहे. आम्ही नाही राहणार पुराच्या साथीनं…, आम्ही नाही सहन करणार पालिकेची निष्क्रीयता…, आम्ही नाही सहन करणार बेकायदा बांधकामं…, आम्ही नाही सहन करणार रस्त्यांवरची अतिक्रमणं… आणि आम्ही स्वतःही एक पाऊल एक्स्ट्रा टाकू…पण नियमांचं उल्लंघन करणार नाही, ही खूणगाठ बुधवारच्या पूरस्थितीमुळं कायमची बांधायला हवी. कारण थेंबे थेंबे तळे साचे…., आपले प्रत्येक छोटे सकारात्मक पाऊल शहराला, समाजाला पुढे नेणारेच असेल.

Disclaimer :-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER