सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सागरी धूप प्रतिबंधक बंधारा समितीचे अनोखे आंदोलन

रत्नागिरी(प्रतिनिधी): रत्नागिरीतील मिऱ्या येथील धूप प्रतिबंधक बंधारा बांधून देण्याचे शासनाचे आश्वासन कागदावरच राहिल्याने सागरी धूप प्रतिबंधक समिती २६ जानेवारीला तीन किलोमीटरची मानवी साखळी उभारून अनोखे निषेध आंदोलन करणार आहे.

पांढरा समुद्र ते मिऱ्या सागरी धुप प्रतिबंधक समितीने याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना सादर केले आहे. या समितीने २६ जानेवारी २०१९ रोजी समितीने मिऱ्या येथील धूप प्रतिबंधक बंधारा बांधून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले होते. त्याची दखल घेत तत्कालीन पालकमंत्री यांनी उध्दव ठाकरे यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री यांना सर्व बाजू समजावून सांगितल्या. त्यानुसार या भागात ३.५ किमीच्या बंधाऱ्याला प्रशासकीय मान्यता मिळाली.

मात्र संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याची योग्य ती दखल न घेतल्याने हे काम कागदावरच राहिले आहे.
गेल्या पावसाळ्यात होता तो बंधारा तुटून गेला. या पावसाळ्यात समुद्राचे पाणी मानवी वस्तीत घुसण्याची शक्यता आहे. असे असूनही सरकारी अधिकारी लक्ष देत नसल्याने या कामाबाबत लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.