अनलॉक इफेक्ट : वर्क फ्रॉम नेचर ?

Man with laptop vector, person working on nature, freelance job distant work. Tourist hiker with computer and internet connection, traveling worker. Mountain tourism

कोरोना महा संसर्गाच्या दरम्यान “वर्क फ्रॉम होम” (Work from home) चा अनुभव सगळ्यांनी घेतला .अजूनही घेत आहेत. परिस्थिती सुधारली असली तरी ,होणारी प्रगती कासवाच्या गतीने आहे .मनातले भय अजूनही संपलेले नाही. त्यामुळे बहुतेक जण अजूनही वर्क फ्रॉम होम (Work from home) च करत आहेत. घरातून काम करण्याचे फायदे कमी, तोटे बरेच जाणवले. कारण माणूस समाजप्रिय प्राणी आहे आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये पिटुकली घरे आणि त्यात दोन किंवा तीन मेम्बर असतील तर अवघड परिस्थिती असते. मागे एका लेखात म्हटल्याप्रमाणे ,घरून काम करताना कामाचे ओझे उलट मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. थोडक्यात काय याचा अनुभव फारसा सुखद ठरलेला नाही.

म्हणूनच आता त्याऐवजी निसर्गाच्या सानिध्यात राहून काम करण्याची ,अर्थात “वर्क फ्रॉम नेचर ” (Work from Nature) चा नवा ट्रेण्ड पर्यटन विश्वात रुजू पाहतो आहे. अनलॉक नंतर नऊ महिने बंद असल्याने एमटीडीसीच्या सगळ्या पर्यटन निवास गर्दी वाढू लागली आहे .पर्यटन ,छोट्या सहली ,वेडिंग डेस्टिनेशन याबरोबरच ही ठिकाणे वर्क फ्रॉम नेचर साठी छान असल्याचे लक्षात आले .कारण अशा ठिकाणी उत्तम कनेक्टीव्हिटी उपलब्ध करून दिली जाते .आणि तिथे काम करताना आपण काम करतोय असे वाटत नाही असा अनुभव काही लोक घेत आहेत.

लॉकडाऊन् मुळे अनेकांनी आपले मानसिक संतुलन कमावले. नोकरी जाणे, आर्थिक विवंचना, भविष्याबद्दलची असुरक्षितता, परिस्थितीतील अस्थिरता ,नातेवाईकांच्या व स्वतःच्या तब्येतीची काळजी, एकाकीपणा, त्यामुळे येणारा थकवा ,कंटाळवाणेपणा ,तोचतोचपणा, सतत घरातच असल्याने परस्परांमधील संघर्ष असे अनेक घटक मानसिक व भावनिक आरोग्यावर परिणाम करत होते.

परंतु कुठलीही नकारात्मकता, कंटाळवाणेपणा किंवा बरेचदा आपल्याला सगळीकडे अप्रिय गोष्टी जेव्हा दिसतात, मनास येत नाही तेव्हा, निसर्गाचा एखादा क्षण कसा आपला मला मूड बदलून टाकतो असा छान अनुभव मला आला .तो शेअर करते.

चार-पाच दिवसांपूर्वीची गोष्ट. एकदा अशीच घराच्या मागच्या ओसरीवरील झुल्यावर थकून बसले होते. मागच्या अंगणात खूप माती ,विटा ,दगड दिसत होते ,ते आवरायचे होते. नुकतेच घराचे रंग काम झाले होते. एकदा वय थोडे मोठे झाले की मोठं घर आवरणं हे जिकरीचे काम होऊन बसतं. अशीच मी दररोज जेव्हा तिथे बसायचे तेव्हा पहिल्यांदा मला ते आवरायला हव असलेलं अंगण दिसायचं आणि मला त्रास व्हायचा. चिडचिड व्हायची. पण अचानक त्या दिवशी माझं लक्ष वरती आकाशाकडे गेलं. नुकतीच संक्रांत होऊन गेली होती. आकाश निळ्याशार होतं . स्वच्छ ऊन पडलं होतं. आणि एका घराच्या टाटा स्काय चा डिस्कवर काही बगळे दिसले. उरलेले सगळे एका रेषेमध्ये चक्कर मारत होते. पांढरे शुभ्र बगळे ,निळ्या आभाळात ! माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले. लहानपणची आठवण झाली,” बगळ्या बगळ्या कवडी दे पाची बोटे रंगू दे !”अस आम्ही म्हणत होतो. अर्थ अजूनही माहीत नाही. मी ते दृश्य डोळे भरूनच नाही , तर मन भरून बघितले .आणि मनातून आनंदाची लकेर आली ,”बगळ्यांची-माळ-फुले-अजुनि-अंबरात….! “तेवढ्यात बालकवी आपल्या श्रावण मासाची आठवण देऊन गेले.” बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते, उतरुनि येती अवनीवरती, ग्रहगोलचि की एकमते “आणि काय सांगु ! इतकं प्रसन्न वाटलं . अक्षरशः विश्वास बसणार नाही. पण आजतागायत हा आनंद मला पुरतो आहे.

हा छोटासाच निसर्गानुभव तुम्हाला सांगण्यामागचे कारण म्हणजे नुकताच एक अनोखा प्रयोग वाचनात आला. आणि त्यामुळे माझ्या या अनुभवांना पुष्टीच मिळाली. आशियातील सगळ्यात पहिले सर्वात मोठे मानसोपचार रुग्णालय चेन्नईत आहे. इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ या संस्थेला सव्वा दोनशे वर्षे पूर्ण होत आहेत. येथे एक नवीन उपचार प्रणाली यशस्वीरित्या लोकप्रिय होत आहे. आणि ती म्हणजे “ग्रीन थेरपी “किंवा “हरित उपचार! “मनोविकार असणाऱ्या व्यक्तींना संपूर्ण दिवस हॉस्पिटलच्या विस्तीर्ण हिरव्यागार बागेत काम करायला सांगितले जाते. आणि अनुभव असा की जे रुग्ण वर्षानुवर्ष बोलत ,हसत नाहीत ,त्यांच्या भावना गोठलेल्या असतात .जीवनेच्छा मेलेली असते .ते रुग्ण या हिरवळीच्या देखभाली तून आश्चर्यकारकरीत्या बदलतात. त्यांची उदासीनता, निराशा नाहीशी होऊन उत्साह तर निर्माण होतोच ,पण भूतकाळातल्या मनावर झालेल्या खोल जखमा भरून येतात. मनामधील कटू आठवणी काही महिन्यानंतर पुसल्या जातात.

या संस्थेच्या संचालिका पुर्णा चंद्रिका सांगतात की ग्रीन थेरपी नुसार ठरवून दिल्याप्रमाणे नियमित बागकाम एकाग्रता, फुप्फुसांना शुद्ध हवा मिळवून देणे, मेंदूला ऑक्सिजन पुरवणे आणि एका ऊर्जेचा अनुभव मिळवून देतात. मनातील सगळ्या नकारात्मक भावना ,चिडचिड, राग राग ,संताप, भयगंड ,न्यूनगंड पळून जातात आणि मग गोळ्या आणि औषध हे पण जास्त प्रभावीपणे काम करू लागतात. म्हणजेच एक supportive थेरपी म्हणून ही ग्रीन थेरपी किंवा हरित थेरपी वापरली जाते. ही कल्पना निझहल शोभा ट्रस्ट, यामुळे रुजली या ट्रस्टच्या शोभा मेनन सांगतात की हिरवलीत प्रसन्न करण्याची जादू आहे. यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपली बॅटरी रिचार्ज करण्यासाठी आणि आंतरिक शांतता आणि एक अनामिक अशी तृप्ती मिळवण्यासाठी कोणीही या पद्धतीचा वापर करायला पाहिजे. पंधरा वर्षांपासून चेन्नई मध्ये सार्वजनिक हरितपट्टा यांचे जतन व संवर्धन करून प्रसन्न करणार्‍या उपचारांची अनुभूती मिळवून देण्याचे काम या ट्रस्ट मार्फत चालते.

याच पार्श्वभूमीवर आजची थ्री स्टार हॉटेल च्या बरोबरी चकचकीत हॉस्पिटल्स ,महागडी औषधे, हजारो टेस्ट, आणि स्ट्रॉंग औषधे यातून आर्थिक मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या हतबल झालेला पेशंट नजरेसमोर येतो. म्हणून ही निसर्गाकडून मिळणारी ग्रीन थेरपी नक्कीच मन मोहून घेते.

यासाठी मानसिक रुग्ण असण्याची गरज नाही ,तर प्रत्येकाने आपले मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवण्यासाठी आणि आपल्या प्रसन्नतेची गुरुकिल्ली म्हणून या ग्रीन थेरपी कडे बघायला पाहिजे. आज बरेच लोक झाडे, भाज्या यांच्या लागवडीकडे वळलेले दिसतात.” गच्चीवरील माती विरहित बाग “यासारखे ग्रुप बघितले की या गोष्टीचे लोकांना महत्त्व पटलेले आहे हे दिसायला लागते. आणि ती निश्चितच मानसिक प्रगतीकडे वाटचाल आहे असे म्हणता येईल.

थोडक्यात काय तर अजून ऑफिस सुरू होईपर्यंत मात्र “वर्क फ्रॉम नेचर!”ही संस्कृती आता रुजणार असं दिसतंय तर !