नागपूरमध्ये आमदार रवी राणा यांच्या गाडीवर दगडफेक

नागपूर : शहरात भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार रवी राणा यांच्या गाडीवर आज अज्ञातांनी दगडफेक केली. यावेळी आमदार रवी राणा गाडीत प्रवास करत नव्हते. या घटनेची माहिती मिळताच वाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महत्वाचे म्हणजे शुक्रवारीच रवी राणा यांनी दसऱ्याच्या दुसऱ्यादिवशी शिवसेना फुटणार असल्याचा गौप्यस्फोट केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार रवी राणा हे आज नागपूरला येणार होते. त्यांना घेण्यासाठी राणा यांची गाडी बडनेराहून नागपूर विमानतळाकडे जात होती. वडधामनजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी गाडी थांबवली. त्यांनी गाडीवर दगडफेक करत तेथून पळ काढला. त्यावेळी गाडीत आमदार रवी राणा नव्हते. याप्रकरणी वाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

रवी राणा यांनी दसऱ्यानंतर शिवसनेना फुटणार असल्याचा शुक्रवारीच केलेला गौप्यस्फोट आणि त्यानंतर शनिवारी त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी केलेली दगडफेक याचा एकमेकांशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.