
नवी दिल्ली : भारतात बहुतेक सर्वच नामवंत कंपन्यांकडून विकले जाणारे ‘ब्रॅन्डेड’ शुद्ध मध भेसळयुक्त असते व त्यात प्रयोगशाळेतील नेहमीच्या चाचण्यांमध्ये हुडकला जाणार नाही असा खास प्रकारचा ‘साखरेचा पाक’ (Sugar Syrup) सर्रासपणे मिसळला जातो, असा धक्कादायक निष्कर्ष एका अभ्यास पाहणीतून समोर आला आहे. दिल्लीतील ‘सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायरोर्न्मेंट’ (CSE) ही ग्राहक हक्कांसाठी लढणारी अग्रगण्य स्वयंसेवी संस्था आणि ‘डाऊन टू अर्थ इंडिया’ या नियतकालिकाने या बेमालूमपणे चालणाऱ्या ‘मधघोटाळ्या’चा पर्दाफाश केला.
‘सीएसई’च्या महासंचालक सुनीता नारायण (Sunita Narayan) यांनी या अभ्यास पाहणीचे निष्कर्ष जाहीर केले. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात लोक तंदुरुस्ती वाढविण्यासाठी मोठ्या विश्वासाने मधाचे सेवन करत असताना या साखरमिश्रित मधाने त्यांच्या आरोग्यास दुहेरी धोका निर्माण व्हावा, ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे त्या म्हणाल्या. या अभ्यासासाठी १३ नामवंत कंपन्यांच्या बाजारात विकल्या जाणाऱ्या मधाचे एकूण २२ नमुने घेण्यात आले. या नमुन्यांची गुजरातमधील ‘नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डा’च्या (NDDB) मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत मधाच्या शुद्धतेसाठी भारतात लागू असलेल्या मानकांच्या निकषांवर तपासणी करण्यात आली. त्यात ‘अॅपिस हिमालया’चा अपवाद वगळता अन्य सर्व बड्या कंपन्यांच्या ब्रॅण्डेड मधाचे नमुने शुद्धतेच्या चाचणीत ‘पास’ झाले.
काही छोट्या कंपन्यांच्या मधात ‘सी-४’ म्हणजे उसाची साखर मिसळल्याचे निष्पन्न झाले. प्रयोगशाळेतील नेहमीच्या चाचण्यांमध्ये हुडकता न येऊ शकणारी अशी खास प्रकारची ‘शुगर सिरप’ मधात मिसळण्यासाठी वापरली जातात. जगभरात अशी भेसळ हुडकून काढण्यासाठी ‘न्यूक्लिअर मॅग्नेटिक रेसोनन्स टेस्ट’ (NMR) ही प्रगत चाचणी केली जाते. ‘सीएसई’ने भारतात ज्या नमुन्यांची चाचणी केली होती त्याच सर्व कंपन्यांच्या मधाची जर्मनीमध्ये ‘एनएमआर’ चाचणी करून घेतली. २२ पैकी फक्त पाच नमुने सर्व चाचण्यांमध्ये ‘पास ’ झाले. डाबर, पातंजली, बैद्यनाथ, झंडू, हितकारी आणि अॅपिस हिमालया यासारख्या नामवंत कंपन्यांचे मध या चाचण्यांमध्ये ‘नापास’ झाले.
म्हणजे त्या मधात खास प्रकारचा साखरेचा पाक मिसळला असल्याचे निष्पन्न झाले. लक्षणीय बाब अशी की, मधामध्ये अशा प्रकारे खास ‘शुगर सिरप’ची भेसळ केली जाते व ती भारतातील प्रचलित शुद्धतेच्या मानकांनुसार प्रयोगशाळेत सहजपणे उघड होत नाही, याची भारत सरकारला चांगलीच कल्पना असावी. कारण यंदाच्या २० ऑगस्टपासून भारतातून निर्यात केल्या जाणार्या मधाची ‘एनएमआर’ चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. दुसरे असे की, ‘गोल्डन सिरप’, ‘इन्व्हर्ट शुगर सिरप’ आणि ‘राईस सिरप’ या प्रकारचा खास साखरेचा पाक मधामध्ये मिसळण्यासाठी भारतात आयात केला जात असल्याविषयी ‘ फूड सेफ्टी अॅण्ड स्टॅण्डर्ड्स अॅथॉरिटी आॅफ इंडिया’ने (FSSAI) राज्यांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना गेल्या वर्षभरात सावध केले होते.
‘सीएसई’ म्हणते की, अशा प्रकारचे खास ‘शुगर सिरप’ चीनमधील कंपन्या तयार करतात व ‘फलशर्करा’ (Fructose) म्हणून त्याची निर्यात करतात, अशी माहिती मिळाल्याने त्या कंपन्यांशी ई-मेलवर संपर्क साधला. त्या कंपन्यांनी असे सिरप पुरविण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार असे शुगर सिरप मागविण्यात आले. ते शुद्ध मधात ४०-५० टक्के मिसळून त्या मधाची प्रयोगशाळेत तपासणी केली असता असे भेसळयुक्त मधही भारतीय तापसणी मानकानुसार ‘शुद्ध’ ठरले. यावरून ही भेसळ किती अक्कलहुशारीने व बेमालूमपणे केली जाते, हेच दिसते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला