चित्रपटातील अनोखे शिक्षक

unique teachers

आज शिक्षक दिन (Teachers Day) आहे. चित्रपटात अनेक कलाकारांनी विविध चित्रपटांमध्ये शिक्षकांच्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र कधी कधी या शिक्षकांच्या भूमिका केवळ नावालाच होत्या तर काही कलाकारांनी साकारलेल्या शिक्षकांच्या भूमिका खरोखरच शिक्षकाच्या भूमिका होत्या आणि त्यातून प्रेक्षकांना, विद्यार्थ्यांना काही तरी घेता आले. चित्रपटात शिक्षकांचे वेगवेगळे रूप दाखवण्यात आले होते. चित्रपटातील अशा वेगळ्या शिक्षकांवर एक नजर.

चित्रपटसृष्टीत संभवतः सगळ्यात पहिल्यांचा 1954 मध्ये आलेल्या जागृती चित्रपटात शिक्षक आणि विद्यार्थ्यांची कथा मांडण्यात आली होती. सत्येन बोस द्वारा दिग्दर्शित या चित्रपटात अभि भट्टाचार्य यांनी शिक्षकाची भूमिका साकारली होती. अभि भट्टाचार्य एक बोर्डिंग स्कूल चालवत असतात आणि या बोर्डिंग स्कूलमधील वात्रट मुलांना ते कसे चांगल्या सवयी लावतात ते या चित्रपटात चांगल्या प्रकारे दाखवण्यात आले होते. हा खरे तर प्रतिबिंब या बंगाली चित्रपटाचाच हिंदी रिमेक होता. याच चित्रपटातील कवी प्रदीप यांनी लिहिलेले, त्यांनीच गायलेले आणि हेमंत कुमार यांच्या संगीताने नटलेले आओ बच्चो तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की हे गाणे आजही लोकप्रिय आहे.

त्यानतंर 1955 मध्ये आलेल्या राज कपूरच्या श्री 420 चित्रपटात नरगिसने आदर्श शिक्षिकेची भूमिका साकारली होती. मुलांनी लहानपणापासूनच खरे बोलण्यास शिकले पाहिजे आणि न घाबरता खरे बोलले पाहिजे असे ती शिकवत असते.1972 मध्ये आलेल्या परिचय चित्रपटात जीतेंद्रने शिक्षकाची भूमिका साकारली होती. एका घरातील मुलांना शिकवण्याची जबाबदारी जीतेंद्र स्वीकारतो आणि त्या घरात जातो. मात्र ती मुले वात्रट असतात. त्यांना तो कसे वठणीवर आणतो ते या चित्रपटात चांगल्या प्रकारे दाखवण्यात आले होते.

केवळ शाळेेतील शिक्षकच नव्हे तर कॉलेजमधील प्रोफेसरच्या कथाही हिंदी चित्रपटात मांडण्यात आल्या होत्या. 1974 मध्ये आलेल्या इम्तिहान चित्रपटात विनोद खन्नाने प्रोफेसरची भूमिका साकारली होती. कॉलेजमधील वाया गेलेल्या मुलांना तो कसा वठणीवर आणतो आणि चांगल्या मार्गाला लावतो ते खूपच चांगल्या पद्धतीने या चित्रपटात दाखवण्यात आले होते. रुक जाना नहीं तू कहीं हार के हे कठिण काळाला घाबरून न जाता मार्गक्रमणा करीत रहा असा संदेश देणारे गाणे याच चित्रपटात होते. हे गाणे आजही लोकप्रिय आहे.

प्रख्यात अभिनेता राजकुमार यांनीही 1981 मध्ये आलेल्या  बुलंदी चित्रपटात प्रोफेसरची भूमिका साकारली होती. या चित्रपटातही व्रात्य तरुण मुलांना ते कसे वठणीवर आणतात आणि वाईट मार्गावरून परत चांगल्या मार्गावर कसे आणतात ते दाखवले होते. हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है, जमाने से नहीं सारखे कचकचित संवाद या चित्रपटात होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये शिक्षकाची भूमिका साकारली आहे.. परंतु संजय लीला भंसालीच्या ब्लॅकमध्ये साकारलेली शिक्षकाची भूमिका खूपच चांगली होती. या भूमिकेसाठी अमिताभ बच्चन यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. एका आंधळ्या परंतु आगाऊ मुलीला राणी मुखर्जीला ब्रेल लिपी शिकवणाऱ्या शिक्षकाची ही भूमिका होती. केवळ ब्रेलच नव्हे तर त्या मुलीला जगण्यासही शिकवताना यात दाखवले होते.

2007 मध्ये आलेल्या तारे जमीन पर चित्रपटात आमिर खानने शिक्षकाची भूमिका साकारली होती. एका वेगळ्या आजाराने त्रस्त असलेल्या मुलाला त्याची गुणवत्ता लक्षात घेऊन त्याला कसे शिकवता येईल ते आमिरने या चित्रपटात दाखवले होते. चित्रपटाची कथा चांगली असल्यानेच आमिरने स्वतःच या चित्रपटाची निर्मिती केली होती. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संबंधांवर आधारित हा एक उत्कृष्ट चित्रपट मानला जातो.

नायिकांना फार कमी वेळा शिक्षिकेच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. राणी मुखर्जीने हिचकीमध्ये शिक्षिकेची भूमिका साकारली होती. हेमा मालिनीने दो और दो पांच मध्ये शिक्षिका साकारली होती. परंतु या नायिकांच्या भूमिका तशा काही महत्वाच्या नव्हत्या. नायिका  ग्लॅमरस असल्यानेच मैं हूं ना मध्ये ग्लॅमरस सुश्मिता सेनला प्राध्यापिकेच्या भूमिकेत सादर करण्यात आले होते. परंतु प्रोफेसरची भूमिका केवळ मनोरंजनाकरिताच होती. अशा प्रकारच्या भूमिका अनेक नायक-नायिकांनी पडद्यावर साकारल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER