‘क्षणपतूर’चा अनोखा अंदाज

Unique prediction of momentary

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. यामागे एक खास कारणदेखील आहे. प्राजक्ताचं नुकतंच एक खास गाणं आलंय, मावळी भाषेतील- ‘क्षणपतूर’. हे शिवकालीन अंगाईगीत सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय. ही अंगाई खूप खास आहे- ती म्हणजे या अंगाईची भाषा आणि हे गाणं खूप कमालीनं शूट केलंय. या अंगाईमध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत झळकली आहे. तिची एक वेगळीच भूमिका आणि कणखर आईचं रूप या अंगाईमधून बघायला मिळतंय.

प्राजक्तासोबत हरेक भारतिया या बालकलाकाराने स्वराज्याचा मावळा उत्तम साकारला आहे. गाण्याचे बोल जितके मधुर आहेत त्याहून सुंदर हे गाणं प्राजक्तानं साकारलं आहे. गाण्याची ही एक महत्त्वपूर्ण बाब म्हटली पाहिजे. ‘क्षणपतूर’ ही एक भावस्पर्शी अंगाई आहे. या अंगाईबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊ या … या गाण्याच्या गीतकार आणि दिग्दर्शिका अनघा काकडे सांगतात, “आई हा प्रत्येक ठिकाणी आपला पहिला गुरू असतो.

आपल्याला इतिहासात अनेक मातांनी आपल्याला कर्तव्याचा धडा शिकवला आहे. हे गाणं लिहिणं खरंच खास आहे; कारण गाण्यातली भाषा वेगळी आहे; म्हणून हे गाणं माझ्यासाठी खरंच खास आहे.” ह्या अंगाईचं वैशिष्ट्य म्हणजे ही मावळी भाषेत तयार केलेली आहे. अंगाई हा आईला तिच्या बाळाशी जोडणारा एक धागा आहे. स्वराज्याच्या कुशीत जन्मलेल्या एका बाळाला त्याची आई आत्ता घटकाभर झोप घे, आत्ता घटकाभर माझ्या जवळ राहा, नंतर तुला स्वराज्यासाठी लढायला हातात तलवार घ्यायची आहे, असं सांगते आहे. प्रत्येक आईला तिचं मूल कायम तिच्यासोबत असावं असं वाटतं. कोणतीच आई त्याला घटकाभर निजून घे असं सांगत नाही; पण ह्या कथेतील आईनं आपल्या बाळाला एवढ्या लहान वयात लढण्यासाठी तयार करणं, स्वतःच्या आईपणाचं कौतुक बाजूला सारून तिच्या मुलातील योद्ध्याला मोठं करणं हेच आपलं ध्येय ठेवलं आहे. ह्या अतिशय सुंदर अंगाईचे शब्द लिहिले आहेत अनघा काकडे हिने आणि तिने स्वतःच ह्या व्हिडीओचं दिग्दर्शन केलेलं आहे.

ह्या सुंदर अंगाईमागचा आवाज आहे नूपुरा निफाडकर हिचा आणि ह्यात एका खंबीर आणि तितक्याच प्रेमळ आईची मुख्य भूमिका प्राजक्ता माळी हिने साकारली आहे. स्वराज्याच्या स्थापनेसाठी ज्या जिजाऊमातेने आपला पुत्र ह्या मातीसाठी अर्पण केला त्याच मातेचे संस्कार पुढे नेत ह्या अंगाईतून एक आई आपल्या मुलाला कणखर करते आहे. राजमाता जिजाऊसाहेबांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा यज्ञ मांडला. हा यज्ञ पूर्णत्वास नेण्यासाठी स्वराज्याच्या चरणी आपला जीव वाहणारे राजांचे साथीदार होतेच; पण त्याचबरोबर होत्या पोलादाचं काळीज असलेल्या आणि जिजाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या स्वराज्यातील सर्व माता ! आपला पती आणि पोटचा पोरही आधी स्वराज्याचा आहे ही भावना जपणाऱ्या आणि मायेपेक्षा कर्तव्य निभावणाऱ्या स्वराज्याच्या माउलींना समर्पित ! या गाण्यात अभिनेत्री प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत आहे.

तिला या गाण्याविषयी काही छान अनुभव आला. ती या गाण्यांबद्दल सांगताना म्हणते, ” एका खंबीर आईची भूमिका करायला मिळाली याचा मला आनंद आहे. ही अंगाई जरी असली तरी यातून आईने आपल्या मुलाला जी कर्तव्याची जाणीव करून दिली, जे बळ आपल्या मुलाला दिलंय हे महत्त्वाचं आहे. जिजाऊसाहेबांची प्रेरणा घेऊन आपल्या बाळाला धैर्य देणारी आई मला खूप जास्त भावली. ” मावळी भाषा आणि त्यातली ही कणखर पण तितकीच गोड आणि आई-मुलाचं सुंदर नात सांगणारी अंगाई नेटकऱ्यांना खूप आवडली आहे. अभिनेत्री प्राजक्ताने गाण्यात खरंच एक खंबीर आई उत्तम साकारली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER