केदार शिंदे यांच्या लग्नाचा अनोखा ‘योगायोग’

Kedar Shinde

आयुष्याचा जोडीदार मिळणे या योगायोगाच्या गोष्टी असतात असं म्हटलं जातं. लग्न जुळलं किंवा नाही जुळलं तरी त्या योगायोगाच्या गोष्टी असतात अशा शब्दात लग्नसंस्थेचं वर्णन केलं जातं. या वाक्याची प्रचिती किती जणांना आली हे माहित नाही पण अभिनेता, निर्माता, गायक, दिग्दर्शक अशा चतुरस्त्र कलावंत असलेल्या केदार शिंदेला (Kedar Shinde) मात्र नक्कीच आली आहे. मैत्रीण बेलासोबत ९ मे १९९६ केदारने लग्न केलं तेव्हा बेलाला घरातून पळून यावं लागलं होतं. त्या परिस्थितीत मोजक्या आठ ते दहा जणांच्या उपस्थितीत केदार आणि बेलाला लग्न करावं लागलं. पण लग्नाचा २५ वा वाढदिवस दणक्यात साजरा करून हजारो निमंत्रितांच्या साक्षीने पुन्हा लग्न करायचे असे त्यांनी ठरवले होते. ९ मे २०२१ ला केदार आणि बेला यांनी पुन्हा लग्नगाठ बांधली खरी पण यावेळीही कोरोना लॉकडाउनमुळे त्यांना मोजक्यांच निमंत्रितांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करावा लागला. २५ वर्षांनी केदार आणि बेला यांनी पुन्हा केलेल्या लग्नात मोजक्याच वऱ्हाडींचा हा अनोखा योगायोग सध्या चर्चेत आहे.

केदारने नुकतीच त्याच्या लग्नाची गाठ दुसऱ्यांदा बांधली. या लग्नाचे फोटो केदारच्या सोशलमीडियापेजवर व्हायरल होत आहेत. या लग्नाचा आनंद केदार आणि बेलाच्या सर्व मित्रमंडळींसह नातेवाईकांनी ऑनलाइन घेतला असला तरी केदारच्या घरीच झालेल्या या लग्नासाठी मोजकेच लोक उपस्थित राहू शकले. यानिमित्ताने केदारला त्याच्या पहिल्या लग्नाचाही किस्सा आठवला आणि तो त्याने लग्नाच्या निमित्ताने शेअर केला.

केदार सांगतो, बेला आणि त्याची ओळख लोकधारा या कार्यक्रमाच्या निमित्ताने झाली. खरंतर सोशॉलॉजीची विद्यार्थिनी असलेल्या बेलाचा लोकधाराशी प्रत्यक्ष काहीच संबंध नव्हता, पण बेलाची बहिण लोकधारा कार्यक्रमात नृत्य करायची. बहिणीसोबत बेला लोकधाराच्या तालमीला आली तेव्हा माझी नजर बेलावर पडली. ओळख, मैत्री झाली. मी जेव्हा तिला प्रपोज केलं तेव्हा तिने नकार दिला. पुढची दोन वर्षे मी तिला पटवत होतो अखेर तिचा होकार मिळवला. पण लग्नासाठी तिच्या घरून परवानगी नसल्याने माझ्यावरील प्रेमाखातर बेला पळून आली. तिचे कन्यादान तिच्या आईवडीलांकडून झाले नाही याची तिला नेहमी खंत वाटायची. लग्नानंतर सगळं काही सुरळीत झालं. मुलगी सनाच्या जन्मानंतर तिच्या कुटुंबीयांनी आमचं नातं स्वीकारलं. आम्ही ठरवलं होतं की लग्नाच्या २५ व्या वाढदिनी पुन्हा लग्न करून त्या सगळ्यांना बोलवायचं ज्यांना आपण लग्नात बोलवू शकलो नव्हतो. यंदा आमच्या लग्नाला २५ वर्षे झाली. पण लॉकडाउनमुळे ना हॉल बुक करता आला ना कुणाला आमंत्रण देता आलं. अर्थात तशी परिस्थितीही नव्हती. पण घरच्या घरी हा क्षण आम्ही अगदी मोजक्या जणांसोबत साजरा केला. बेलाच्या कन्यादानाची जबाबदारी आमचे मित्र आदेश व सुचित्रा बांदेकर यांनी स्वीकारली. योगायोग म्हणा किंवा हिस्ट्री रिटर्न म्हणा, या दुसऱ्या लग्नातही बेलाच्या माहेरची मंडळी तिचे कन्यादान करायला येऊ शकले नाहीत, पण हा विवाहसोहळा त्यांनी व्हिडिओकॉलिंगवर पाहिला.

कोणत्याही विषयाला मिश्किल फोडणी देण्यात केदार माहीर आहे. त्याच्या सिनेमा, नाटक, मालिकेतही अशा विनोदाची पेरणी त्याचे चाहते नेहमीच पाहतात. त्यामुळे त्याच्या विनोदी शैलीतही सध्याच्या कोरोना परिस्थितीत साजऱ्या झालेल्या २५ व्या अॅनिव्हर्सरीत जुळून आलेल्या मोजक्या वऱ्हाडींचा हा योगायोग त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. पळून जाऊन केल्यानं आमचं पहिलं लग्न मोजक्याच वऱ्हाडींच्या साक्षीने झालं आणि जेव्हा लग्नाच्या २५ व्या वाढदिनी ही कसर भरून काढायचं ठरवलं तेव्हा कोरोनामुळे इच्छा असूनही मोजक्याच वऱ्हाडींना बोलवावं लागलं. तेव्हाही बेलाचं कन्यादान तिच्या आईबाबांनी केलं नाही आणि आता त्यांना परिस्थितीमुळे करता आलं नाही. फक्त तेव्हा आमच्या लग्नात मुलगी सना नव्हती आणि आता मात्र सगळी तयारी करण्यात तीच पुढं होती असं म्हणत केदारने त्याच्या स्टाइलमध्ये या खास लग्नाचं वर्णन केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button