एकतर्फी ठरवलेली १९५९ ची एलएसी मान्य नाही; भारताने चीनला बजावले

Xi Jinping - PM Narendra Modi

दिल्ली : लडाखच्या पूर्व भागात वास्तविक नियंत्रण रेषेवरून (एलएसी) (LAC) भारत-चीनमध्ये (India-China) वाद कायम आहे. चीनने पुन्हा एकदा एलएसीच्या विषयावर नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने चीनची मग्रुरी ठेचून काढत चीनचा एलएसीबाबतचा दावा फेटाळून लावताना बजावले आहे की – भारतीय भूभागात अतिक्रमण करणाऱ्या चीनने १९५९ साली एकतर्फी नियंत्रण रेषा ठरवली होती. चीन त्याचा दाखला देतो आहे. चीनचा हा एकतर्फी दावा भारताला मान्य नाही.

याबाबतच्या प्रश्नाला पत्रकार परिषदेत उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले – १९५९ साली चीनने एकतर्फी ठरवलेली नियंत्रण रेषा भारताने कधीही मान्य केलेली नाही. आमची भूमिका कायम आहे. चीनसह सर्वांनाच ती माहीत आहे.

चीनचे तत्कालीन पंतप्रधान झोउ एनलाई यांनी ७ नोव्हेंबर १९५९ रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना एक पत्र पाठवले होते. त्यात प्रस्तावित केलेल्या नियंत्रण रेषेचे चीन पालन करेल, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एका वृत्तपत्राला सांगितले. त्यावर भारताने चीनची १९५९ सालची एलएसीबद्दलची व्याख्या मान्य नाही, असे स्पष्टपणे सांगितले.

एलएसीवर शांतता आणि स्थिरता ठेवण्यासाठी १९९३ साली झालेला करार, १९९६ साली दोन्ही बाजूंमध्ये विश्वास निर्माण करण्यासंबंधी झालेला करार, २००५ साली भारत-चीन सीमा प्रश्न सोडवण्यासाठी झालेला करार या करारांचे दाखले अनुराग श्रीवास्तव यांनी यावेळी दिलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER