पत्नीवर निराधार आरोप करणे हा पतीकडून तिचा होणारा छळ

Nagpur Bench - Wife Harassment
  • हायकोर्टाने या मुद्द्यावर घटस्फोट कायम केला

नागपूर : पत्नी आणि तिच्या माहेरच्या मंडळींवर निराधार आरोप करणे आणि त्या आरोपांच्या आधारे पत्नीची नोकरी धोक्यात आणण्यासाठी उचापती करणे हा पतीकडून पत्नीचा केला जाणारा मानसिक छळ ठरतो व  हिंदू विवाह कायद्यानुसार अशा छळाच्या मुद्द्यावर पत्नी घटस्फोट मिळण्यास पात्र ठरते, असे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench) म्हटले आहे.

थलराज ऊर्फ आनंद जयसिंग खिन्ची या पतीने केलेले अपील फेटाळताना न्या. ए. एस. चादूरकर व न्या. पुष्पा गनेडीवाला यांनी हा निकाल दिला. थलराजची पत्नी ज्योती (पूर्वीश्रमीची ज्योती बजरंगसिंग चौहान) हिने केलेली याचिका मंजूर करून नागपूर येथील कुटुंब न्यायालयाने त्ला थलराजपासून गटस्फेट मंजूर केला होता. तिला हा घटस्फोट छळ व सासरी न नोंदविणे या कारणांवरून दिला गेला होता. थलराजने कुटुंब न्यायालयाच्या या निकालाविरुद्ध अपील केले होते.

ते फेटाळताना खंडपीठाने म्हटले की, थलराजने पत्नीने केलेल्या घटस्फोटाच्या दाव्यात तिच्याविरुद्ध व तिच्या माहेरच्या मंडळींविरुद्ध प्रामुख्याने दोन आरोप केले होते. एक. ज्योतीला फिट येतात ही गोष्ट लग्नाआधी दडवून ठेवली गेली होती व दोन, ज्योतीचे कुटुंब ‘राजपूत’ समाजातील असूनही त्यांनी ‘राजपूत भामटा’या आदिवासी जमातीचे खोटे प्रमाणपत्र मिळवून तिला राखीव जागेवर नोकरीस लावले होते.

खंडपीठाने म्हटले की, यापैकी ज्योतीला लग्नाच्या आधीपासून फिट येत असल्याचा आरोप थलराजने कुटुंब न्यायालयात साक्ष देताना प्रथमच केला. पण त्याच्या पुष्ठयर्थ कोणतेही पुरावे दिले नाहीत. बनावट जातीच्या दाखल्याविषयी थलराज ज्योतीच्या कार्यालयाकडे वारंवार तक्रारी करत असे. परंतु तेथेही त्याने आपल्या आरोपाच्या समर्तनार्थ कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.
न्यायालयाने म्हटले की, पत्नीविरुद्ध असे निराधार आरोप करणे व त्याआधारे तिची नोतरी घालविण्याचा प्रयत्न करणे हा पतीने तिचा केलेला मानसिक छळच आहे. त्यामुळे अशा छळाच्या कारणावरून कुटुंब न्यायालयाने ज्योतीला घटस्फोट मंजूर करण्यात काहीच चूक नाही.

येथे हेही लक्षात घ्यायला हवे की, या प्रकरणातील ज्योती चकणापूर (खापरखेडा) येथील  सरकारी उच्च प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे तर थलराज बेरोजगार आहे.

-अजित गोगटे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER