देशातील बेरोजगारीने दोन वर्षांत गाठला उच्चांक

Unemployment

नवी दिल्ली :- लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बेरोजगारीवर केलेल्या प्रहारानंतर बेरोजगारीचा आकडा समोर आला आहे. देशातील बेरोजगारीचा दर एप्रिलच्या तीन आठवड्यांत 7.9 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांतील हा बेरोजगारीचा उच्चांक असल्याची आकडेवारी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई) ने जाहिर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी वर्षाला तब्बल दोन कोटी रोजगार देणार असल्याचा दावा केला होता. मात्र, त्यांच्या धोरणांमुळे रोजगारच गेल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. आता या महिन्यातील बेरोजगारीचा आलेख चढाच असल्याचे दिसून आले आहे. नोटाबंदी, जीएसटीमुळे जवळपास 4 ते 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्याचा अहवाल नुकताच समोर आला होता. यावरून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दाच विरोधी पक्षांनी बनविला आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात असलेला बेरोजगारीचा दर 7.9 टक्क्यांवरून दुसऱ्या आठवड्यात 8.1 तर तिसऱ्या आठवड्यात 8.4 टक्के झाला आहे. केवळ तीन आठवड्यांतच हा दर 0.5 टक्क्यांनी वाढल्याने बेरोजगारी पुढील काळात मोठे रुप घेण्याची शक्यता आहे.

एका राष्ट्रीय इंग्रजीवृत्तपत्राच्यानुसार एनएसएसओ या सर्व्हेमध्ये 2017-18 या वर्षांत पुरुष कामगारांची संख्या 28 कोटी 60 लाखावर आली आहे. ती 2011-12 मध्ये 30 कोटी 40 लाख होती. तर 2011-12 पासून आतापर्यंत 4 कोटी 70 लाक रोजगार कमी झाले आहे. या रिपोर्टमध्ये शहरी आणि ग्रामीण भागाची वेगवेगळी आकडेवारी देण्यात आली आहे. त्याप्रमाणे शहरात बेरोजगारीचा दर 7.1 टक्के तर ग्रामीण भागात तो 5.8 टक्के एवढा राहिला आहे.