नोकऱ्या जात असल्याने राज्यातील पत्रकारांमध्ये अस्वस्थत

CM
  • त्रिपक्षीय बैठक बोलावून तोडगा काढण्याची सरकारकडे मागणी
  • मराठी पत्रकार परिषदेचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन

मुंबई :- कोरोनाचे निमित्त करून बड्या माध्यम समुहातून पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचार्‍यांची मोठ्या प्रमाणात कपात केली जात आहे. अत्यंत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या या कपातीमुळे अनेक पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचाऱी रस्त्यावर आले आहेत.. या विरोधात पत्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाची भावना असल्याने राज्य सरकारने मध्यस्थी करून सरकार, माध्यम समुहांंचे मालक आणि प्रमुख पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींची एक संयुक्त बैठक बोलवावी आणि यातून सन्माननिय तोडगा काढावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्‍वस्त एस.एम.देशमुख यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.

22 मार्च पासून राज्यात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे काही वृत्तपत्रांनी आपले प्रकाशन थांबविले. त्यानंतर काही दिवसातच पुन्हा वृत्तपत्रे प्रकाशित होऊ लागली.. मात्र कोरोनामुळे उद्दभवलेल्या संधीचा लाभ उठवत अनेक मराठी, हिंदी आणि इंग्रजी वृत्तपत्रांनी आपल्या आस्थापनातील पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचार्‍यांच्या हाती नारळ देण्याचा सपाटा सुरू केला. नक्की आकडेवारी उपलब्ध नाही मात्र, जवळपास साडेचार ते पाच हजार पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचारी ‘कोरोनाचे शिकार’ ठरले असावेत असा अंदाज आहे. कर्मचारी कपात करताना अनेक वृत्तपत्रांनी आपल्या आवृत्या बंद केल्या, काहीनी रविवार पुरविण्या थांबविल्या, बहुतेक वृत्तपत्रांनी पानांची संख्या कमी केली, तर काहींनी यापैकी काहीही न करता कर्मचारी कपात केली.

ही बातमी पण वाचा : म्हणजे अंतिम वर्षाच्या परिक्षेचा निर्णय युजीसीच्या गाईडलाईन प्रमाणे नव्हता!; शेलारांचा ठाकरे सरकारला चिमटा

कोरोनामुळे खप घटला आणि जाहिरातीचे प्रमाण कमी झाले असल्यानं खर्चात कपात करणे भाग पडत असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. हे जरी खरं असलं तरी जेव्हा ही मिडिया घराणी सरकारकडून अनेक सवलती मिळवत होती आणि मोठा नफा कमवत होती तेव्हा या घराण्यांनी मजिठियाचे पूर्णपणे अंमलबजावणी केलेली नव्हती. मात्र दोन महिन्यातच कर्मचार्‍यांच्या हाती नारळ दिले जात आहे. यामुळे राज्यातील माध्यम क्षेत्रात मोठीच अस्वस्थतः आहे. दिल्लीत एका पत्रकाराने नोकरी गेल्याने केलेली आत्महत्या हे एक उदाहरण असले तरी अनेकजण नैराश्याच्या गर्देत गेले आहेत.

तेव्हा सरकारने आाता जास्त वेळ न घालवता सरकार, माध्यमांचे व्यवस्थापन आणि पत्रकार संघटनांच्या प्रतिनिधींची एक त्रिपक्षीय बैठक तातडीने बोलावून या पेचप्रसंगातून तातडीने मार्ग काढावा अशी मागणी एस.एम.देशमुख यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या निवेदनावर परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक,अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी आदिंच्या स्वाक्षर्‍या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER