रवी पुजारीला सेनेगल येथे अटक; आज भारतात आणणार

Ravi Pujari

मुंबई : महाराष्ट्रासह इतर राज्यातील गुन्ह्यांसाठी पाहिजे असलेला कुख्यात गुंड रवी पुजारी याला पुन्हा आफ्रिकेतील सेनेगलची राजधानी डकार येथे अटक करण्यात आली. स्थानिक यंत्रणांच्या मदतीने ‘रॉ’ या भारतीय गुप्तचर संस्थेचे अधिकारी व कर्नाटक पोलिसांच्या पथकाने संयुक्तपणे केलेल्या कारवाईत रवी पुजारी पकडला गेला. पुजारीच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सध्या पूर्ण केली जात असून आज संध्याकाळी किंवा उशिरा रात्री पोलीस त्याला भारतात आणतील, अशी शक्यता आहे.

गेल्या वर्षी २१ जानेवारी २०१९ रोजी पुजारीला सेनेगलची राजधानी डकार येथे एका हेअर कटिंग सलूनधून अटक करण्यात आली होती. तेव्हापासून त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू होते. दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर जून २०१९ मध्ये तो फरार झाला. आता सेनेगलमध्येच त्याला अटक करण्यात आली.

महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादेत शिवसेनाविरुद्ध भाजप, नेत्यांमध्ये जुंपली

पुजारीला भारताच्या हवाली करण्यात आले आहे. रविवारीच पुजारीला भारतात आणतील. आधी कर्नाटक पोलिस त्याला ताब्यात घेतील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

अँथोनी फर्नांडिस नावाने वावरायचा

रवी पुजारी, अँथोनी फर्नांडिस या नावाने वावरत होता. सेनेगलमधील तपास यंत्रणांकडे त्याच्या याच नावाची नोंद होती. बुर्किना फासो या देशाचा पासपोर्ट त्याच्याकडे होता. रवी पुजारी आधी थायलंड, मलेशिया, मोरोक्को या देशांत राहिला आहे. नंतर पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो, कोंगो रीपब्लिक, गिनी, आयव्हरी कोस्ट आणि सेनेगल या देशांत त्याने आपला मुक्काम हलवला.

गेल्या आठ वर्षांत पुजारीने सेनेगल, बुर्किना फासो या देशांत ‘नमस्ते इंडिया’ नावाने अनेक रेस्टॉरंट उभारली. सेनेगलची राजधानी डकारमध्ये जवळपास गेल्या दशकभरापासून तो पत्नी, मुलांसह राहत असून अत्यंत आलीशान जीवन जगत आहे.

कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरातमध्ये अनेक गुन्हे

रवी पुजारीवर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी व अन्य अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कर्नाटकात बेंगळुरूमध्ये ३९, मंगळूरमध्ये ३६, उडुपीमध्ये ११ तर म्हैसूर, हुबळी-धारवाड, कोलार आणि शिवमोगामध्ये प्रत्येकी एक गुन्हा पुजारीविरुद्ध दाखल आहे. महाराष्ट्र मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये पुजारीविरुद्ध ४९ गुन्ह्यांची नोंद आहे. त्यातील २६ गुन्हे मकोकाखाली दाखल झालेले आहेत. गुजरातमध्ये त्याच्याविरुद्ध खंडणी प्रकरणी ७५ गुन्ह्यांची नोंद आहे. गेल्या दोन दशकांपासून पुजारी भारताला गुंगारा देत आहे.