कळले सारे…पडद्याच्या पलीकडले

कोरोनाच्या (Corona virus) विळख्यात अनेक उद्योग, व्यापार ठप्प झाले. निसर्गाने अगदी जिथल्या तिथे स्टॅच्यू म्हणावे इतकं सगळं एका क्षणात थांबलं. अर्थात यामध्ये टीव्ही मालिकांच्या चित्रीकरणाचेही पॅकअप झाले. मार्चच्या मध्यंतरात थांबलेले मालिकांचे शूटिंग अखेर स्वच्छता, सुरक्षेच्या नियमावलीने जुलैच्या मध्यंतरात सुरू झाले. एकीकडे मालिका पुन्हा सुरू होणार याचा आनंद होता आणि दुसरीकडे अजूनही कोरोनाचे सावट निवळले नसल्याने धास्तीही होती. दीड महिना सगळं काही सुरक्षितपणे सुरू होतं. फक्त शॉटपुरती मास्कला विश्रांती दिली जात होती. अख्खा सेट रोजच्या रोज सॅनिटराइज केला जात होता. मेकअप टेक्निकची माहिती असलेले कलाकार स्वत:च मेकअप करत होते. लंचब्रेकमध्ये आधी अगदी मांडीला मांडी लावून पंगत बसायची तिथे सोशल डिस्टंसिंग हा नियम बनला होता.

इतकं सगळं काटेकोरपणे सुरू असूनही गेल्या १५ दिवसांत मालिकांच्या सेटवर कोरोनाचा शिरकाव झालाच. खरं तर मालिकांच्या कथानकाला वास्तवाशी जोडून प्रेक्षकांच्या रोजच्या जगण्याशी मालिकेचा धागा जुळवण्याचा प्रयत्न सुरू असतो; मात्र बहुतांशी मालिकांच्या सेटवर कोरोना घुसल्यानंतर कलाकार, निर्माते, चॅनेल प्रतिनिधी यांनी सोशल मीडियावरून प्रेक्षकांशी संवाद साधत पडद्यापलीकडील गोष्टी शेअर केल्या. अभिनयाच्या पलीकडे साधलेला हा खराखुरा संवाद होता. यामुळे सध्याच्या कोरोना संकटाशी सामना करत शूटिंगचे शिवधनुष्य पेलतानाही कोरोना वादळ ज्या मालिकांच्या सेटवर आले त्या मालिकांचे शिलेदार खऱ्या अर्थाने वास्तवात आले. काही मालिकेच्या पडद्यामागील कलाकारांना तर काही मालिकांच्या मुख्य कलाकारांना होमक्वारंटाईनचा शिक्का लागला.

‘आई माझी काळूबाई’ मालिकेतील आशाताई बावगावकरांचा कोरोनाने बळी गेला. पाठोपाठ याच मालिकेच्या युनिटमधील २७ जण पॉझिटिव्ह झाले. साताऱ्यातील फलटण परिसरात लावण्यात आलेल्या या मालिकेच्या सेटवर असलेली गजबज एकदम शांत झाली. ही मालिका सुरू होऊन १५ दिवसही झाले नसताना, सर्व प्रकारची काळजी घेतली जात असताना हे असं कसं झालं, हा प्रश्न प्रत्येक कलाकार स्वत:ला विचारत होता. त्यात सहा दिवसांत आशालतांचे आयुष्यच संपले हा धक्काही मोठा होता. या दरम्यान अर्थातच शूटिंग थांबवण्यात आले. यातूनच काही अफवा, गैरसमज सोशल मीडियावरून व्हायरल झाले, ज्यामध्ये मालिकेत काळूबाईंची भूमिका करणाऱ्या आणि या मालिकेच्या निर्मात्या अलका आठल्ये यांची प्रकृती चिंताजनक असल्याची अफवा पसरली. मालिका कायमस्वरूपी बंद होत असल्याचीही आवई उठली. आशालता यांचे अंत्यसंस्कार करून भरलेल्या डोळ्यांनी अखेर अलका आठल्ये या मालिकेच्या निर्माती या नात्याने फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आल्या. सेटवर कशी काळजी घेतली जात होती, सुरक्षेचे नियम पाळले जात होते हे थेट दाखवून त्यांनी वास्तव समोर आणले. इतकेच नव्हे तर आशालताताईंच्या पाठोपाठ माझेही कोरोनाने निधन झाले म्हणून मला ऑनलाईन श्रद्धांजलीही वाहण्यात आल्याचे त्यांनी सांगितलेच नाही तर अशा मेसेजचा स्क्रीनशॉटही शेअर केला.

शेवटी अफवा, गैरसमजांचे विषाणू पसरवू नका म्हणत त्यांनी विनंती केली. ही घटना अजूनही ताजी असतानाच ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेतील मुख्य नायिका आसावरीचे पात्र रेखाटणाऱ्या अभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण झाल्याने प्रकृतीही गंभीर असल्याची वार्ता पसरली. निवेदिता यांना सर्दी, कणकणची लक्षणं दिसली म्हणून त्यांनी टेस्ट केली आणि पॉझिटिव्ह येताच त्यांनी ही माहिती चॅनेलला कळवली आणि होमक्वारंटाईन झाल्या. बातमी खरी असली तरी ती मीठमसाला लावून सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे लक्षात येताच निवेदिता यांनी एक व्हिडीओ बनवला ज्यामध्ये त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले. निवेदिता यांचा सहभाग असलेली एपिसोड बँक संपल्यानंतर जेव्हा ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेची वेळ झाली तेव्हा छोट्या पडद्यावर अभिनयापलीकडे सगळे कलाकार प्रेक्षकांशी वास्तवातील संवाद साधत होते.

सुरक्षा, स्वच्छता याबाबत काटेकोरपणासाठी सेटवर प्रत्येकाला अधिकारवाणीने सांगणारी ऑनस्क्रीन आसावरी प्रत्येक सहकलाकार मिस करत होता. एक एपिसोड फक्त सेटवरील स्वच्छता, मेकअपरूमधील सोशल डिस्टंसिंग याचा आँखो देखा हाल सांगत होते डॉ. गिरीश ओक आणि तेजश्री प्रधान. तेव्हा ते ना अभिजित राजे होते ना ती शुभ्रा कुलकर्णी. मालिकेची कथा, नाट्य, डायलॉगबाजी यापलीकडे आपल्या ऑनस्क्रीन कुटुंबातील आसावरी कोरोनाबाधित झाल्याने वाटणारी काळजी, आसावरीच्या अनुपस्थितीत पुढे काय करता येईल याविषयीचा संवाद अगदी मोकळेपणाने सुरू होता.

‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेत जिजामातेच्या भूमिकेत असलेल्या अमृता पवारला कोरोना झाल्यामुळेच तिला ही मालिका सोडावी लागली आणि अचानक या भूमिकेत भार्गवी चिरमुलेला पाहून प्रेक्षकांमध्ये चुकीची माहिती जाऊ नये यासाठी अमृताने थेट व्हिडीओद्वारे ही माहिती दिली होती. ‘प्रेम पॉयझन पंगा’ या मालिकेतही महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या स्वप्नील राजशेखरला होमक्वारंटाईन व्हावे लागल्याने त्याच्या जागी शेखर फडकेची वर्णी लागली तेव्हा त्यामागचे खरे कारण स्वप्नीलने त्याच्या फेसबुक पेजवरून सांगितले. थोडक्यात काय तर कोरोनासारख्या संकटातही मालिकेच्या शूटिंगसाठी जीव धोक्यात घालून मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांनी पडद्यापलीकडील गोष्टी शेअर करताना ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन यातील दरी मिटवून टाकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER