‘ही चेतावणी समजा अगर विनंती !’ खा. संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकारला ठणकावले

Sambhaji Raje Chhatrapati-Uddhav thackeray

कोल्हापूर : कित्येक मराठ्यांच्या पोरांना नोकरीच्या नियुक्तीसाठी ऑर्डर मिळाली आहे. मात्र, कामावर घेतले जात नाही. अशी परिस्थिती आहे. मराठ्यांना आरक्षण मिळेलच. परंतु तुमच्या हातात जे आहे ते आधी करा. याला चेतावणी समजा अगर विनंती, असं राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी राज्य सरकारला आज ठणकावून सांगितले. ते आज कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा सकल मराठा समाजाच्यावतीने (Maratha Community) आयोजित न्यायिक परिषदेत बोलत होते.

मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नावर न्यायालयीन लढाई लढण्याची तयारी करण्यासाठी कोल्हापुरात सकल मराठा समाजाच्यावतीने आज रविवारी न्यायिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला युवराज संभाजीराजे छत्रपती, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, मुंबई उच्च न्यायालयाचे वकील राजेंद्र दाते-पाटील, अ‌ॅड. आशिष गायकवाड, राजेंद्र टेकाळे यांच्यासह कोल्हापूर व अन्य पाच जिल्ह्यांतील ज्येष्ठ विधिज्ञ उपस्थित होते.

संभाजीराजे म्हणाले, नोकरीबाबत वकिलांनीही सरकारला जाब विचारावा. शिवाय २०१४ ते २०२० पर्यंत नियुक्त्या का झाल्या नाहीत? यावर सरकारविरोधात याचिका दाखल करू, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच आरक्षणाच्या लढ्यासंदर्भात कोल्हापूरने महाराष्ट्राला दिशा द्यावी.

ते म्हणाले, वकिलांच्या कार्यावर माझा विश्वास आहे. मात्र, सरकारने यंत्रणा तयार ठेवली पाहिजे. मागासवर्गीय आयोगाने आपल्याला मागास जाहीर केले आहे. हातात सोन्याचे बिस्कीट(ईएसबीसी) असताना तुम्ही आर्थिक मागासची (ईडब्लूएस) अपेक्षा का करता? उद्या जर ईडब्लूएस घेतले तर सर्वोच्च न्यायालय विचारेल. तुम्हाला अगोदर आरक्षण असताना तुम्ही ईएसबीसी आरक्षण का मागता? त्यामुळे समाजाची भूमिका मराठा आरक्षण मिळवण्याचीच पाहिजे. जे लोक ईडब्लूएसचे समर्थन करतात त्यांनी लिहून द्यावे की, मराठा आरक्षणाला फटका बसणार नाही, असे आवाहनही खासदार संभाजीराजे यांनी केले. ज्या नामवंत मराठा वकिलांनी समाजासाठी वेळ दिला त्यांना या प्रक्रियेत सामावून घ्यायला हवे. महाधिवक्ता सांगतील त्याच वकिलांची नेमणूक का? असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आरक्षणासाठी लढा सुरूच आहे. मात्र, निर्णय न्यायप्रविष्ट आहे. अशा वेळी तज्ज्ञांचे मत विचारात घेणे गरजेचे आहे. सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहेच. मात्र, कोणत्या मार्गाने लढाई लढवता येईल या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

केवळ मराठा समाजाला एकत्र आणणे माझे ध्येय नाही तर बहुजन समाजाला सोबत घेऊन जाणे हा माझा विचार आहे. त्यामुळे बहुजन समाजाने आवाज उठवणे गरजेचे आहे. आरक्षणाची तिसरी लढाई ही न्यायिक लढाई आहे, असेही संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

यावेळी मार्गदर्शन करताना नाबार्डचे अध्यक्ष यशवंतराव थोरात म्हणाले, समाजाचा वकिलांवर विश्वास आहे. समाजाला ताकद मिळवण्यासाठी आरक्षणाची गरज आहे. त्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. मराठा समाज सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याने ओबीसी आरक्षणाला समकक्ष आहे. म्हणून आरक्षण मिळण्यास पात्र आहे.

परिषदेत अ‌ॅड. राजेंद्र दाते पाटील, अ‌ॅड. राजेंद्र टेकाळे, अ‌ॅड. श्रीराम पिंगळे या मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञांनी मार्गदर्शन केले.

कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‌ॅड. रणजित गावडे, जयेश कदम, सचिन तोडकर, दिलीप पाटील, दिलीप देसाई,मधुकर बिरंजे, तसेच सकल मराठा समाज आणि जिल्हा बार असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व सदस्य वकील, त्याचबरोबर सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर येथील वकील उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER