मुख्यमंत्र्यांच्या कुशल नेतृत्वाखाली सरकार प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे – नाना पटोले

Nana Patole

मुंबई : कोरोना (Corona), लॉकडाऊनने (Lockdown) राज्यातील सुक्षीक्षीत तरूण अजूनच मागे गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे असे सांगत महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची मोठी संख्या लक्षात घेता सरकारने येणाऱ्या नव्या वर्षापासून शासकीय सेवेत रिक्त असणाऱ्या 1 लाखांपेक्षा जास्त पदांसाठी तातडीने सुधारित महापोर्टल तयार करुन भरतीप्रक्रिया सुरु करावी, अशी शिफारस विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहून केली आहे.

तसेच नाना पटोले यांनी पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुकदेखील केले आहे. “मुख्यमंत्र्यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार कोरोना संकटकाळाचा यशस्वीपणे मुकाबला करीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे”, असं म्हणत पटोले यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलंय.तसेच, नवीन वर्षाच्या शुभेच्छाही पत्राच्या माध्यमातून पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत.

दरम्यान, नाना पटोले यांनी पत्रात नुद केले आहे की, “केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाच्या तसेच महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. राज्यातील मागील सरकारने मेगाभरतीचा फुगा फुगवून सुशिक्षित बेरोजगारांची दिशाभूल केल्याने तरुणांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात नैराश्याची भावना निर्माण झाली आहे. राज्याच्या अर्थचक्राला गती देणारा आणि राज्याच्या विकासात योगदान देणारा हा तरूण वर्ग अशा प्रकारे वैफल्यग्रस्त होणे उचित नाही. त्यासाठी लवकरात लवकर भरतीप्रक्रिया सुरु करावी”, असं नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

“महाराष्ट्रातील शासकीय सेवेत सध्या एक लाखांपेक्षा जास्त पदे रिक्त असून सुशिक्षित आणि होतकरु तरूण वर्ग महाराष्ट्र लोकसेवा आयोग वर्ग-1, वर्ग-2 आणि वर्ग-3 विभागातल्या सेवाभरती प्रक्रियेकडे डोळे लावून आहे. यासंदर्भात होणारा विलंब त्यांच्यात नैराश्य आणि वैफल्य वाढविणारा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संदर्भात तातडीने निर्णय घेणे आवश्यक” असल्याचं पटोले यांनी पत्रात म्हटलं आहे.

“कोरोना संसर्गाची परिस्थितीत आता बऱ्यापैकी आटोक्यात येत असल्याने येणारे नवीन वर्षापासून ही भरती प्रक्रिया सुधारित महापोर्टलद्वारे तातडीने सुरु करण्यात यावी. त्याचप्रमाणे कोरोना संदर्भात उद्भवलेल्या परिस्थितीमुळे वयोमर्यादा तसंच अट शिथिल करण्यात यावी”, अशी शिफारसही पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय.

राज्यात मोठ्या संख्येने असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांची भावना आणि राज्य सरकारकडून त्यांची असलेली अपेक्षा लक्षात घेता आपण यासंदर्भात लक्ष घालून तातडीने पावले उचलाल ही अपेक्षा पटोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER