महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी; फडणवीसांची टीका

Devendra Fadnavis

मुंबई : महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी लागू असल्यासारखे वातावरण आहे. सरकारच्या विरोधात बोलले की, तुरुंगात टाकले जाते आहे. कुठल्या तरी प्रकरणात अडकवले जाते आहे. अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) आणि कंगना यांच्या प्रकरणात ठाकरे सरकारला चपराक बसली आहे. तरीही महाराष्ट्रात कुणीही काहीही सरकारच्या विरोधात बोलले की त्याला कुठल्या तरी केसमध्ये अडकवायचे असे सुरू आहे, अशी टीका हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषदेत केली.

तुमच्यावर केस दाखल केली जाईल किंवा जेलमध्ये टाकू, असे धमकावले जाते आहे. अर्णब गोस्वामी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल आणि कंगना राणावत प्रकरणात हाय कोर्टाने दिलेला निकाल हे सरकारला चपराक देणारे आहेत. अर्णब गोस्वामी आणि कंगना यांच्या सगळ्या विचारांशी आम्ही सहमत नाही. मात्र ज्या प्रकारे कारवाई झाली आणि जे कोर्टाने या दोन्ही प्रकरणात जे ताशेरे ओढले आहेत त्यानंतर या सरकारला तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. तरीही, यातून सुधारण्याऐवजी हे सरकार सत्तेचा अहंकार दाखवते आहे. असे अहंकारी सरकार जगाच्या पाठीवर कधीही कुठेच चालत नाही, असे फडणवीस म्हणालेत. या अहंकाराला आम्ही योग्य उत्तर देऊ. कोणताही संघर्ष करण्यासाठी आम्ही मागेपुढे पाहणार नाही. जनतेच्या प्रश्नांवर आणि जनतेसाठी आम्ही सरकारला उत्तर देऊ.

हे सरकार अहंकारी आहे या सरकारचे निर्णय हे तुघलकी आहेत. अधिवेशनात जो काही वेळ आम्हाला मिळेल त्यात आम्ही सरकारला जाब विचारू, असे ते म्हणाले. या सरकारला अधिवेशन घेणे निश्चितपणे शक्य होते. काल शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मेळावे झाले ना? आम्हीही मेळावे घेत आहोत. जर हे सगळे होऊ शकते तर अधिवेशन एक किंवा दोन आठवडे का घेतले जात नाही? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

कृषी कायद्यांबाबत जे सांगत आहेत की चर्चा झालीच नाही, याला काही अर्थ नाही. कृषी विधेयक राज्यसभेत गेले तेव्हा चर्चा करा सांगत असताना फक्त घोषणाबाजी झाली. चर्चेच्या वेळी घोषणा द्यायच्या आणि मग म्हणायचे की चर्चेला वेळ दिला नाही! याला काय अर्थ आहे? असाही प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER