कार्यक्षम कारभारासाठी काकांकडून कानउघाडणी

Sharad Pawar

वयाच्या ऐंशीव्या वर्षी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना किती धडपड करावी लागत आहे. सरकार खरे तर शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तीन पक्षांचे आहे पण आज सरकारचा भार जणू पवार एकटे वाहत आहेत. सरकार जिथे कमी पडेल तिथे पवार धावून जात आहेत. जिथे कमी तिथे आम्ही असेच जणू त्यांचे झाले आहे.

पवार यांची ही भूमिका अपेक्षितच आहे 1978 मध्ये राज्यात पहिले बिगर काँग्रेसी सरकार स्थापन केले होते. त्यानंतर गेल्यावर्षी त्यांनी महाविकास आघाडी सरकारचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना,धर्मनिरपेक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीन दिशांना असलेल्या तीन पक्षांना एकत्र आणण्याची किमया केवळ आणि केवळ पवार साहेब यांच्यामुळेच साधल्या गेली हे निर्विवाद सत्य आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण सरकारचे खरे शिल्पकार होते ते शरद पवारच.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात यश आले तेही पवार यांच्यामुळे.त्यावेळी ते असे काही डावपेच खेळले की भलेभले गारद झाले. जे सरकार आपल्या पुढाकाराने आणि राजकीय कौशल्याने सत्तेत आले ते टिकवणे आणि त्याची घडी बसवणे याची जबाबदारीही महाविकास आघाडीचे सर्वोच्च नेते म्हणून शरद पवार यांनी घेतलेली आहे असे दिसून येते. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे काल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लॉकडाउन कसा कसा शिथिल करावा याबाबत दिलेला कानमंत्र. लॉकडाऊन काही ठिकाणी शिथिल करण्यात आला असला तरी त्याबाबतच्या सूचना प्रशासनाकडून योग्य पद्धतीने दिल्या जात नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. हा गोंधळ दूर करा अशा कानपिचक्या पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचे वृत्त आहे.

ही बातमी पण वाचा : शरद पवारांच्या हस्तक्षेपानंतर टाळेबंदीसंदर्भात काहीप्रमाणात अटी शिथिल

एकूणच परिस्थिती हाताळण्यात प्रशासनाला अपयश येत असल्यामुळे पवार नाराज असल्याचे व ती नाराजी त्यांनी उद्धव यांच्याकडे व्यक्त केल्याचे म्हटले जाते. त्यांच्यासारख्या परिपक्व नेत्याने ही नाराजी जाहीरपणे व्यक्त केलेली नाही. कारण त्यांना आघाडीधर्म पाळायचा आहे. सरकारच्या कारभाराबाबतची नाराजी जाहीरपणे व्यक्त करून ते भाजपच्या हातात कधीही कोलीत देणार नाहीत. आपल्या विधानाचा आधार घेऊन भाजपवाले सरकारवर तुटून पडतील असेही ते होऊ देणार नाहीत. म्हणूनच त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांशी बोलून जे सांगायचे ते सांगितले. त्याचा काही तासातच परिणाम झाला. पवार साहेब मुख्यमंत्र्यांशी सकाळी बोलले आणि संध्याकाळी लॉकडाऊन शिथिल करण्याबाबतचा सुस्पष्ट आदेश राज्य शासनाने काढला.

शरद पवार हे ग्रामीण व शहरी महाराष्ट्राची नाडी अचूक कळणारे आणि महाराष्ट्राच्या समाजजीवनाचा साठ वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव असलेले ज्येष्ठ नेते आहेत. सरकारला त्यांनी लॉकडाऊन संदर्भात अत्यंत मोलाच्या सूचना केल्या आहेत. त्यासाठी 8 कलमी कार्यक्रमच त्यांनी उद्धव यांना दिला. सखेद आश्चर्य या गोष्टीचे वाटते की ज्या पक्षाने महाराष्ट्राचे अनेक वर्षे नेतृत्व केले त्या काँग्रेसचे नेते कुठे आहेत? सध्याच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारला काही ठोस सूचना करणारे एक निवेदन प्रदेश काँग्रेसच्या वतीने मुख्यमंत्र्यांना दिले गेले पाहिजे. राज्याची गाडी रुळावर आणण्यासाठी काँग्रेसच्या काय कल्पना आहेत हे जनतेला कळायला हवे.

सध्या रमझानचा महिना सुरू आहे मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि उत्साहाचा हा महिना. लॉक डाऊन 22 मे पासून शिथिल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.त्यानंतर तीन दिवसांनी रमझान ईद आहे. ईदच्या तीन दिवस आधी लॉकडाऊन शिथिल करण्याच्या ठाकरे सरकारच्या या निर्णयाबाबत मुस्लिम बांधवांमधे खूप उत्साहाचे वातावरण आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

Web Title : Sharad Pawar speech for efficient management

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)