दादाच्या नाटकाने उमेशची एन्ट्री

Umesh Kamat

आपल्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी ध्यानीमनीही नसताना होत असतात. ठरवून ,आखीवरेखीव नियोजन करून काही गोष्टी करण्यापेक्षा असे अनपेक्षित जेव्हा आपल्या आयुष्यात काहीतरी घडतं आणि त्यातून जेव्हा आपल्या करिअरचा मार्ग मिळतो तेव्हा ते सगळेच खूप भारी असतं. अभिनय क्षेत्रातही असे अनेक जण आहेत ज्यांना अचानक अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यानंतर ते या क्षेत्रातच स्थिरावले. एखाद्याचा अभिनय पाहून अभिनय करावा असं वाटणं स्वाभाविकच आहे पण एखादी भूमिका आपल्याला चालून आली आणि ती भूमिका केल्यानंतर अभिनय हाच आपला प्रांत होणार यावर शिक्कामोर्तब होतं. अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) याच्याही बाबतीत असंच झालं.

उमेशचा भाऊ जयेश ज्या नाटकात काम करत होता त्याच नाटकातील बालकलाकाराचा रोल पुढे उमेशकडे आला आणि त्या संधीचं सोनं करत उमेशचे रूपेरी दुनियेत आगमन झाले. उमेश कामत याच्या कुटुंबियातील कोणीच अभिनय क्षेत्रामध्ये नाही. तरीदेखील उमेश सध्या नाटक सिनेमा आणि मालिका यामधून उत्तम काम करत आहे. घरातलं कुणीच अभिनय क्षेत्रात नसताना उमेश या क्षेत्राकडे कसा आला हा प्रश्न त्याला अनेकदा विचारला जातो आणि त्याचे उत्तरही एकदम रंजक आणि हटके आहे. उमेशच्या घरातले जरी कुणी अभिनयक्षेत्रात नसलं तरी उमेशच्या आई-बाबांना नाटकांची प्रचंड आवड होती. कामत यांच्या घरात नाटक पाहायला जाणं ,नाटकांवर चर्चा करणं या सगळ्या गोष्टी नेहमी व्हायच्या. उमेशचा मोठा भाऊ जयेश यालादेखील अभिनयात आवड होती. आणि तो शाळेत असताना नाटकातही काम करत होता. मात्र उमेश या सगळ्यापासून नेहमीच लांब असायचा. एकदा एका नाटकासाठी बाल कलाकार हवेत अशी जाहिरात उमेशच्या आई-बाबांना दिसली. ते उमेशचा मोठा भाऊ जयेशला घेऊन ऑडीशनला गेले. दिलीप कोल्हटकर हे त्या नाटकाचं दिग्दर्शन करत होते आणि मोहन वाघ हे नाटकाचे निर्माते होते. नाट्यक्षेत्रातील ही दोन मोठी माणसं आणि त्यांच्या तालमीमध्ये जर जयेशला काम करण्याची संधी मिळत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे असा विचार आईबाबांनी केला. साठ मुलांमधून जयेशची निवड झाली. साठ मुलांमधून निवडलेल्या पाच मुलांमध्ये जयेशची निवड झाली. त्यातून तीन मुलं निवडायची होती. त्या नाटकातील काही संवाद जयेशला दिले आणि जयेशने अशी काही छाप सोडली की त्याची या नाटकात वर्णी लागली. या नाटकाचे काही प्रयोग झाले ते तुफान गाजले. मात्र दरम्यान जयेशची उंची वाढली, या नाटकातील बालकलाकार म्हणून जे पात्र होतं त्याला ती योग्य नव्हती. जयेश यापुढे ही भूमिका करू शकणार नाही हे तर नक्की होतं. दादाचे काम बघायला उमेश नेहमी नाट्यगृहात जायचा आणि विंगेत खेळत बसायचा. मोहन वाघ आणि दिलीप कोल्हटकर यांनी उमेशचं वावरणं बघितलं होतं. जयेश आता ही भूमिका करू शकणार नाही हे जेव्हा नक्की झालं तेव्हा त्या दोघांनीही उमेशने त्या नाटकात काम करावं अशी विनंती त्याच्या आई बाबांना केली. तर उमेशला या नाटकाचा गंधही नव्हता आणि आवडही नव्हती. त्यांच्याकडे ही संधी चालून आली होती. त्यांनी उमेशला सांगितलं की प्रयत्न करून बघू ,जमलं तर ठीक नाहीतर राहू दे .

उमेशने नाटकातील संवाद बोलून दाखवले. उमेशचे काम कोल्हटकर आणि वाघ यांना अतिशय आवडलं आणि त्याच्या मोठ्या भावाची म्हणजेच उमेशच्या दादाची भूमिका उमेशला देऊ केली. दादाचे नाटक बघायला नाट्यगृहात येणाऱ्या उमेशचे असे अचानक रंगमंचावर दादाची भूमिका घेऊन पदार्पण झाले आणि त्यानंतर उमेशने मागे वळून पाहिलेच नाही.

स्वामी, रणांगण, मन उधाण वाऱ्याचे, गांधी आडवा येतो, डोन्ट वरी बी हॅपी, दादा एक गुड न्यूज आहे अशा अनेक नाटकांमधून उमेशने त्याच्या अभिनयाची छाप पाडली. नाटकांप्रमाणे मालिकांमध्ये देखील चॉकलेट बॉय इमेज त्याने कायम ठेवली. फार सिनेमे केले नसले तरी मोजक्या सिनेमातही त्याच्या अभिनयाने चाहत्यांची पसंती मिळवली आहे.

अभिनेत्री प्रिया बापटसोबत उमेशचे लग्न झाले असून या दोघांची केमिस्ट्री आणि एक क्युट कपल अशी त्यांची इंडस्ट्रीमध्ये ओळख आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER