पहिला लिखित जाहीरनामा लिहून स्वातंत्र्याची घोषणा करणारे खंडोबाचे निस्सीम भक्त उमाजीराजे नाईक !

Umaji Raje Naik

पुरंदर किल्ल्याच्या रक्षणाची पिढ्यानपिढ्या जबाबदारी रामोश्यांकडे, नाईकांकडे होती. पेशवाई (Peshwai) दिवसेंदिवस कमजोर पडत गेली आणि त्याचा फायदा घेत इंग्रजांनी पेशव्यांना हातात धरून मनमानी कराभार  सुरू केला. १८०३ ला दुसरा बाजीराव गादीवर आला. त्यानं पुरंदरची जबाबदारी रामोश्यांकडून काढून घेण्याचं फर्मान जारी केलं. पेशव्यांचा हा निर्णय रामोशी समाजाला मान्य नव्हता. पिढ्यानपिढ्यांची  जबाबदारी  पेशवे एका फर्मानानं काढून घेणार हे त्यांना पटलं नाही. ही बाब आता प्रतिष्ठेची बनली.

मर्दानी बाणा आणि स्वाभिमान उराशी ठेवणारी ही माणसं, त्यांनी बंडाचं निशाण फडकावलं. पेशवाईच्या शेवटच्या काळात नादान बाजीराव विरोधात रामोश्यांनी पुरंदरात बंड केलं. पेशवाईचा मुत्सद्दी सरदार बापूजी गोखले (Sardar Bapuji Gokhale) यांनी रामोश्यांच्या वस्त्यांवर छापा टाकून बंड मोडण्याचा  प्रयत्न केला. त्यात रामोश्यांचे अनेक पुढारी मारेल गेले. पेशव्याच्या सैनिकांनी रामोश्यांची घरं लुटली. जगलेल्यांना पुरंदरातून हाकलून लावलं.

पुरंदरच्या केदारनाथाच्या चरणावर घडल्या प्रकाराचा सूड घेण्याची प्रतिज्ञा राघोजीनं घेतली. राघोजी नाईक (Raghoji Naik) उमाजी नाईकांचा (Umaji Naik) मोठा चुलतभाऊ. त्यावेळी मंदिरात उमाजी नाईक हेसुद्धा होते. प्रतिज्ञा  घेतली आणि राघोजी बाजीरावाच्या सैन्यावर तुटून पडला. तुफानासारखा यायचा आणि वावटळासारखा निघून जायचा. राघोजी नाईकानं पेशव्यांच्या सैन्याच्या मनात धडकी भरवली.

हा तो काळ होता जेव्हा पेशवाईनं इंग्रजांशी हात मिळवला. पेशव्यांना आता इंग्रजांचं सहकार्य होतं. पेशव्यांची ताकद वाढली होती. उमाजी आणि राघोजींनी तरीही हल्ले सुरू ठेवले. इंग्रज असो की पेशवे. राघोजीनं आणि उमाजींनी त्यांना हैराण करून सोडलं. अशाच एका लुटीच्या वेळी इंग्रजांच्या अचानक झालेल्या  हल्ल्यात राघोजी आणि त्याचा मुलगा जखमी झाला. त्यातच त्यांनी जीव सोडला. या हल्ल्यात उमाजी नाईक हेसुद्धा गंभीर जखमी झाले; पण ते निसटले ते तडक पुरंदरला आले.

पुरंदरात नाईकांवर हल्ला झाला होता. नाईकांचं सारं लुटलं गेलं त्याचा बदला घेण्याची प्रतिज्ञा करणारा भाऊसुद्धा उमाजींना गमवावा लागला. वारं उलट्या दिशेनं  वाहू लागलं होतं; पण थांबतील ते उमाजी नाईक कसले ? त्यांनी परत केदारनाथा चरणी डोके ठेवले आणि भावाची अपुरी राहिलेली प्रतिज्ञा पूर्ण करायची शपथ घेतली.

आद्यक्रांतिकारी उमाजीराजे नाईक

उमाजींनी आता स्वतःला राजे घोषित केलं. भारताच्या स्वातंत्र्याचा पहिला जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केला. त्यांना लिहिता-वाचता यायचं. या जाहीरनाम्यात इंग्रज अधिकारी दिसेल तिथं कापून काढा. आजपासून भारतभूमी स्वतंत्र झाल्याची घोषणा मी करतो- असा मजूकर होता. काळाच्या कित्येक पावलं उमाजीराजे नाईक (Umaji Raje Naik) पुढं होते, याचं उदाहण हा जाहीरनामा देतो.

राघोजी नाईकांचा बंदोबस्त झाला म्हणून बेफिकीर पेशवाई आणि इंग्रज सैन्यावर उमाजीराजेंनी परत तुफान हल्ले केले. या कामात लहूजी वस्ताद साळवे त्यांच्या मदतीला होते. पुण्यातल्या तालमीत तरणीताठी पोरं सैनिकी प्रशिक्षण देऊन तयार करायची आणि ती पुढं उमाजीराजेंच्या सैन्यात भरती करायची. हे त्यांनी सुरू ठेवलं. इंग्रज आणि पेशव्यांवर उमाजीराजे बिजलीसारखे कडकडत राहिले. उमाजीराजेंची धास्तीच जणू इंग्रज आणि पेशव्यांनी घेतली होती. कुठल्या परिस्थितीत उमाजी राजेंचा बंदोबस्त करायला हवा म्हणून त्यांनी हातपाय मारायला सुरुवात केली.

स्वातंत्र्य लढा सुरू राहावा म्हणून त्यांनी बड्या श्रीमंतांची घरं लुटली. केलेल्या लुटमारीतून मिळालेला पैसा, सोनं-नाण्यातला काही हिस्सा ते  खंडोबाचरणी अर्पण करायचे. जगातली सर्वोत्तम फौज म्हणवल्या  जाणाऱ्या  इंग्रज फौजांचा उमाजीराजेंचं  नाव ऐकलं तरी थरकाप उडत असे.

दिवसेंदिवस इंग्रजांचा जनतेवरचा वाढता जाच आणि अन्याय उमाजीराजेंना बघवला नाही. उमाजीराजेंनी इंग्रजांविरुद्ध मोहिमा उघडल्या. इंग्रजांना भारातातून  हद्दपार करू, अशी शपथ त्यांनी जेजुरी गडावर मल्हारी मार्तंडापुढं भंडारा उधळून घेतली.

इंग्रजांशी झुंज घेणारे उमाजी नाईक आता ते क्रांतिवीर झाले होते; पण नियतीचा डाव चुकला आणि उमाजीराजे १८३१ ला पकडले गेले.  ३ फेब्रुवारी १८३१ ला त्यांना फाशीची शिक्षा झाली. ज्याला भारताचा पहिला स्वातंत्र्य लढा म्हणलं जातं त्या १८५७च्या उठावाआधी उमाजीराजेंनी  भारतीय स्वातंत्र्याचा लिखित जाहीरनामा प्रसिद्ध करून भारतीय स्वातंत्र्याचा शंखनाद केला होता. अशा या द्रष्ट्या क्रांतिवीराला स्मृतिदिनी नमन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER