उजनीचं पाणी पेटलं, सोलापूरचं पाणी इंदापूरला नेण्याला स्थानिकांचा विरोध!

Maharashtra Today

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं विक्राळ रुप धारण केलं असताना सोलापूर पुन्हा चर्चेत आलंय. काही दिवसांपुर्वीच मंगळवेढा-पंढरपूरची निवडणूक पार पडली, यानंतर तिथं कोरोनाग्रस्त रुग्णांच प्रमाण मंगळवेढा-पंढरपूरात वेगानं वाढतंय. अशा परिस्थीतीत सोलापूरकर पुन्हा रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत आणि याला कारण ठरतायेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे (Datta Bharane). सोलापूर आणि मराठवाड्याच्या उद्धारासाठी उभारलेल्या उजनी धरणातलं (Ujani water Ignited) हक्काचं ५ टीएमसी पाणी इंदापूरला वळत करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळं नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याच चित्र आहे.

सोलापूरच्या सर्व गावांना पाणी मिळण्यासाठी बांधलं गेलं होतं धरण

यशवंतराव चव्हाणांनी १९६४ साली उजनी धरणाचा मुळ प्रस्ताव मांडला होता. हे धरण दुष्काळग्रस्त सोलापूर जिल्ह्याच्या उद्धारासाठी बांधण्यात आलंय. पुणे जिल्ह्याला उजनीतून पाणी जावं अशी कोणतीच तरतुद करण्यात आलेली नाही असं बोललं जातंय. सोलापूरच्या सर्व तालुक्यांमध्ये पाणी पोहचतं करावं असा धरण बांधणीचा उद्देश होता परंतू योजना पुर्ण होऊन ४० वर्ष उलटूनही सोलापूरला पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. अनेकदा उजनी धरणाचं बारामतीकडे वळण्याचे प्रयत्न होत असल्याचं स्थानिक सांगतात. दोन वर्षांपूर्वी निरेच्या डाव्या कालव्याच पाणी अजित पवारांनी बारामतीला वळवलं, सोलापूरच्या हक्काचं पाणी अजित पवारांनी पळवलं असा आरोप सोलापूरच्या शेतकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केले होते. त्यावेळी अजित पवारांवर (Ajit Pawar) प्रचंड टीका झाली होती. आता महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सत्तेत आहे. सोलापूरच पालकमंत्री पद राष्ट्रवादीच्या दत्ता भारणे यांच्याकडे आहे. ते इंदापूरचे आमदार आहेत. गेल्या दोन लोकसभा निवडणूकीत सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) मतदान न करणाऱ्या २२ गावांची नाराजी दुर करण्यासाठी उजनीतलं पाणी इंदापूरला नेलं जाणार असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत.

स्थानिक नेत्यांच्या भुमिकेकडे लक्ष

देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) कार्यकाळात विरोधी पक्षात असलेल्या अजित पवारांनी दोन वर्षांपूर्वी नीरा-देवघरचे पाणी बारामतीकडं वळवल्याच स्थानिक सांगातात. नंतर नीरा नदी आडवून सोलापूर (Solapur) जिल्ह्याच्या हक्काचं ८ टीएमसी पाणी अडवण्याचं काम सुरु असल्याचं बोललं जातंय. ऐन उन्हाळ्यात दुष्काळी सोलापूरच्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज असताना उजनी धरणातलं पाणी बारामतीला नेण्याचा पालकमंत्र्यांनी घाट घातलाय का? असा प्रश्न सध्या उपस्थीत होतोय. या परिस्थीतीत सोलापूरच्या स्थानिक नेत्यांनी पक्षश्रेष्ठींची मर्जी सांभाळ्यापेक्षा जनतेची बाजू उचलून धरावी अशी मागणी स्थानिक सोलापूर करताना दिसत आहेत.

५३ टीएमसी पाण्यापैकी ८० टीएसी पाणी करावं लागतंय वितरीत

उजनी धरणातील उपलब्ध पाणी आणि त्यातून वितरीत होणाऱ्या पाण्याच्या प्रमाणाचं गणित जुळताना दिसत नाही. धरणात ५३ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा असताना एकूण पाणी ८० टीएमसी वितरीत केलं जावं असा अजब हिशेब करण्यात आल्याचं शेतकरी नेते सांगातात. पैकी उजनी धरणावरच्या शिरापूर, आष्टी, एकरुख, बार्शी, सांगोला आणि दहीगाव अशा उपसासिंचन योजनासाठी १२ टीएमसी पाण्याची गरज आहे. उजनी धरणातलं खरडून पाणी काढलं तरी या योजनांना पुर्ण पाणी मिळत नसल्याचं चित्र आहे.

अजित पवारांच्या निर्णयामुळं नदीचं अस्तित्व धोक्यात?

उजनी धरणात नीरा-देवघरच्या पाण्यामुळं चांगला जलसाठा सोलापूरच्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होतो. पंरतू अजित पवारांनी सत्तेवर येताच नदीच पात्र फिरवण्याचा अजब निर्णय घेतलाय. नीरा- देवघरचं पाणी फलटण व सोलापूरच्या जनतेला हक्कानं देण्याचा निर्णय भाजप कार्यकाळात झाला होत; राज्यात सत्ता बदलताच अजित पवारांनी निर्णय फिरवला. बारामती जवळच्या उद्धट- तावशी इथल्या नीरा नदीला अडवून ८ टीएमसी पाणी उजनीकडे वळवायचा प्रकल्प युद्ध पातळीवर सुरु आहे. यामुळं नीरा नदीचं ५४ किलोमीटरच अस्तित्व संपेल अशी भीती आहे. तर सोलापूरला येणारं नीरा नदीचं पाणी बंद होईल होणार असल्याचं जलअभ्यासक सांगतात.

राज्यात सद्यस्थितीला आरोग्य आणीबाणीची परिस्थीती ओढावली आहे. यातच सत्ताधारी सोलापूरचं पाणी वळवून पाणीबाणी निर्माण करत आहेत. असं म्हणात सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक शेतकरी नाराजीचा सुर व्यक्त करत आहेत. सोलापूरला हक्काच पाणी मिळेल की कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल याच उत्तर येणारा काळच देऊ शकतो.

 Disclaimer :  ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button