उगाच उवाच… अवयव वाटपाची बिघाडी !!!!

Mahavikas Aghadi - Editorial

Shailendra Paranjapeरोज रोज करोनावर (Corona) लिहायचे म्हटले की जरा बोअरिंग वाटू शकते, म्हणजे वाचणाऱ्यांना. त्यामुळे राजभवनातल्या नाचऱ्या मोराबद्दल लिहिले पण त्यातही करोनाचा संदर्भ आलाच. त्यामुळे करोनाच्या निर्जीव विषाणूने मनाचा ताबा घेतलाय का, असा विचार केला. पण रोजच्या घडामोडी, त्याच्या बातम्या आणि त्यातून काही विचारमंथन व्हावं, त्यावर पुणेरी म्हणून ओळखली जाणारी कॉमेन्ट करावी, कट्ट्यावर बसल्याचा फील द्यावा, यासाठी लिहित असल्याने आज तशी बातमी सापडलीय. म्हणजे ज्यावर लिहिल्यास करोनाचा वर आलेला उल्लेख सोडला तर पुन्हा येणार नाही, अशी बातमी.

महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला (BJP) बाजूला ठेवून उर्वरित तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आणण्यात ज्यांचा अदृश्य नाही तर प्रत्यक्ष हात होता, ते शरद पवार (Sharad Pawar) आजारातून पुन्हा नव्या जोमाने कार्यसिद्ध होताहेत. त्यांची ख्यालीखुशाली विचारण्यासाठी शिवसेनेचे दिव्यदृष्टी संजय राऊत गेले. उभयतांची चर्चा झाली आणि त्या मंथनातून बाहेर आले ते राष्ट्रीय पातळीवर भाजपाविरोधी आघाडीच्या शक्यतेचं पिल्लू.

प्रवक्ते जनरली मनाचे बोलत नाहीत कारण त्यांना पार्टीलाइन टो करावी लागते. पण कधी पक्षाला अडचणीत आणणारे बोलले तर मात्र ते त्यांचं वैयक्तिक मत होतं, असं पक्षाला जाहीर करावं लागतं. अलीकडेच नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यासंदर्भात असा प्रकार घडला आहे. त्यामुळे उगाच संजय उवाच यांनी पवारसाहेबांच्या भेटीनंतर जे काही वक्तव्य केलंय ते शिवसेनेचं म्हणणं आहे की पवारांचं की…..की संजय राऊत (Sanjay Raut) भावावर अन्याय झालाय असं वाटल्यानंतर क्वचित स्वतःचं म्हणणं मांडतात तसं स्वतःचं म्हणणं मांडताहेत, हे समजायला मार्ग नाही. पण यावेळी राष्ट्रीय पातळीवर आघाडीच्या हाचाली सुरू होतील, असं सांगतानाच राऊत यांनी या आघाडीचा आत्मा कॉँग्रेस असेल, असं म्हटलंय. ममता बँनर्जी (Mamata Banerjee) यांनी बंगालमधे चांगली मुसंडी मारलीय, अशी पुस्तीही त्यांनी जोडलीय पण त्याबरोबरच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राने करोना नियंत्रणात चांगली कामगिरी बजावल्याचं राऊत यांनी आवर्जून सांगितलंय, वास्तविक, पवारसाहेब आणि राऊत भेटले की असं काही तरी होतंच असतं. आत्ताही झालं मग त्यात काय वेगळं असं तुम्हाला वाटेल. पण म्हणतात ना दुधानं जीभ पोळली की माणूस ताकही फुंकून पितो…तसंच कालपरवाच्या पवार-राऊत भेटीचं झालं. मागच्या वेळी पवारसाहेबांना भेटून आल्यावर राऊत साहेबांनी असं विधान केलं होतं की राष्ट्रीय पातळीवर भाजपाविरोधी आघाडीचं नेतृत्त्व शरद पवारसाहेबांनी करावं. ते विधान बूमरँग झालं आणि कॉँग्रेसवाले पेटून उठले. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी संजय राऊत यांना सुनावले. तो अनुभव गाठीशी असल्याने दुसऱ्याच्या काठीने साप मारला तरी पुरावे शोधून काढले जातातच, हे ओळखून साहेबांनी दिव्यदृष्टी संजय राऊत यांना यावेळी वेगळा बाईट द्यायला सांगितला की काय अशी शंका येते.

पश्चिम बंगालमधे पवारसाहेबांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अदृष्य हात असो किवा नसो पण उगाच उवाच यांचे बोलविते धनी कोण असतात आणि त्यामागे कोणाची अदृष्य जीभ असते, हे सारा महाराष्ट्र ओळखून आहे. त्यामुळेच मग गेल्या वेळी जीभ पोळल्याने आता उगाच मधमाश्या अंगावर नको यायला म्हणून कॉँग्रेसला आघाडीच्या आत्म्याचा रोल पवारसाहेबांनी देऊ केलाय का… मुळात राज्यात सत्तेत असूनही कॉँग्रेस आणि कॉँग्रेसच्या सर्व मंत्र्यांचं रूपांतर पवारसाहेबांनी मामु माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून (खास वाक्प्रचार राजकारण्यांचा) जिवंत अस्वस्थ आत्म्यांमधे करून टाकलंय. त्यात आता राष्ट्रीय पातळीवरही कॉँग्रेसला आत्म्याचं चिरंतनत्व द्यायला साहेब सिद्ध होताहेत.

साहेबांचा काही भरवसा नाही बुवा…कधी काय बोलतील आणि करतील सांगता येत नाही. कधी कोणाबरोबर जातील आणि कधी कोणाचं विसर्जन करतील, हेही सांगता येत नाही. त्यांच्या मनात काय चाललंय कोणीच सांगू शकत नाही., म्हणून तर राष्ट्रीय पातळीवर पक्षीय विचारात त्यांच्यावर कुणाचा विश्वास नाही. ते खूप लांबचा विचार करतात. म्हणून तर ते बंगालमधे अदृष्य हाताची कमाल दाखवताना पंढरपूरसारख्या जवळच्या ठिकाणी अडखळतात.

नव्या आघाडीचा आत्मा म्हणजे कॉँग्रेस, मेंदू शरद पवारसाहेब, शरीर ममता-स्टालिन-उठा असेल तर मनात कितीही स्वप्नं असली आणि मेंदूनं कितीही आदेश दिले तरी शरीर साथ देत नाही अशी स्थिती होऊ शकते कारण…… या सर्व अवयव वाटपात जनतेला कुठे स्थान दिसत नाहीये.

शैलेन्द्र परांजपे

Disclaimer : ‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button