उद्धव ठाकरेंनी माझे फोन घेतले नाही मात्र राष्ट्रवादी व इतरांशी ते बोलत होते : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM-Uddhav

मुंबई: शिवसेनेशी संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण शिवसेनेनेच आमच्याशी चर्चा करणे थांबवले, असे सांगतानाच मी स्वत: राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आणि एका पक्षाचा नेता म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेकवेळा फोन केले. पण उद्धव ठाकरे यांनी माझा एकही फोन घेतला नाही, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधाताना फडणवीस यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यावर हा आरोप केला. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राज्यात पारदर्शी सरकार देण्यासाठी आम्ही प्रयत्न केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांचे हे वक्तव्य आमच्यासाठी धक्कादायक होते. कारण महायुतीला जनतेने मतदान केले होते. महायुती म्हणून आम्ही निवडून आलो होतो. असं असताना उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर आमच्यासमोर सर्व पर्याय खुले आहेत, असे का म्हटले? हा आमच्यासमोर प्रश्न होता. त्यानंतर मी संवाद साधण्यासाठी मी स्वत: उद्धव ठाकरेंना अनेकदा फोन केले. पण त्यांनी माझेही फोन घेतले नाही. त्यांनीच चर्चा थांबवली. शिवसेनेनेच चर्चेची दारे बंद केली होती. आम्ही चर्चा थांबवली नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ही बातमी पण वाचा : यापुढे जे सरकार येईल ते भाजपच्या नेतृत्वाखालीच येणार -देवेंद्र फडणवीस

काँग्रेसशी मात्र रोज चर्चा

शिवेसनेने आमच्याशी चर्चा केली नाही याचे दु:ख नाही, त्यांनी आमच्याशी चर्चा न करता काँग्रेस आणि राष्ट्रवादी चर्चा केली. दोन्ही काँग्रेससोबत चर्चा करायला त्यांच्याकडे वेळ होता. ज्यांच्याविरोधात जनतेकडे मतं मागितली, त्यांच्याशी चर्चा होत होती. पण आमच्याशी चर्चा होत नव्हती. एकदा नव्हे दिवसातून तीन तीनवेळा चर्चा केली. याचे दु:ख होते, असे सांगतानाच काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा करण्याची उद्धव ठाकरे यांनी निकालाच्या पहिल्याच दिवशी मानसिकता केली होती, असा दावाही त्यांनी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधात बसण्याची भूमिका स्पष्टपणे मांडलेली असताना भाजपशी संवाद तोडण्याचे काम शिवसेनेने केले, ते योग्य नव्हते, असेही त्यांनी सांगितले.
मोदींवरील टीका चुकीचे

ही बातमी पण वाचा : उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदावर ठाम; एकनाथ शिंदेंची माहिती

मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमच्यासाठी वंदनीय आहेत. त्यांच्याविरोधात भाजपकडून कोणतेही वक्तव्य केले गेले नाही. कधीही करणार नाही, असे सांगतानाच गेल्या पाच वर्षात शिवसेनेने मात्र आमचे सर्वात मोठे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अत्यंत खालच्या दर्जाची टीका केली. त्यांनी मुखपत्रातूनही टीका केली आणि जाहीरपणेही टीका केली. केंद्रात मोदींसोबत राह्यचे आणि इकडे टीका करायची हे योग्य नव्हते. काँग्रेसनेही कधी त्यांच्यावर एवढ्या थराला जाऊन टीका केली नव्हती. विरोधकांनी जेवढे घातले नाही तेवढे घाव त्यांनी घातल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.