उद्धव यांचे भाषण, हिंदुत्व राष्ट्रीय नेतृत्व अन् दिशाहिनता

Uddhav Thackeray

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिलेले भाषण म्हणजे जायचे नागपूरला आणि तिकिट काढले मुंबईचे अशा पद्धतीचे वाटले. त्यांना नेमके कुठे जायचे आहे आणि ते जाताहेत कुठे हे काही कळले नाही. जीएसटीची प्रणाली रद्द करून पूर्वीचीच करप्रणाली आणावी या मागणीसाठी देशातील सर्व मुख्यमंत्री मिळून आपण पंतप्रधानांना भेटुयात असे आवाहन त्यांनी केले. एकाक्षणी उद्धव हे आता स्वत:ला राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाताहेत असे जाणवले.

खरेच ते तसे करू शकतील का?देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. तेथील मुख्यमंत्री उद्धव यांच्या नेतृत्वात येण्याची शक्यता नाहीच. तमिळनाडूतील अण्णाद्रमुक, आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस, तेलंगणातील तेलंगणा राष्ट्र समिती, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस हे पक्ष उद्या उद्धव यांनी आवाहन केले तरी त्यास प्रतिसाद देण्याची कुठलीही शक्यता नाही. त्यातच महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेली काँग्रेस ही उद्धव यांना राष्ट्रीय पातळीवर जाण्यास मदत करण्याची कुठलीही शक्यता नाही. भाजपच्या विरोधात राष्ट्रीय पातळीवरील एकमेव पर्याय आपणच आहोत आणि आपल्या पंखांखाली इतर सर्वांनी एकत्र यावे असाच काँग्रेसचा आग्रह राहील. त्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात वातावरण तयार करण्यापलिकडे उद्धव या प्रकरणात फारसे काही करू शकणार नाहीत. महाराष्ट्रात भाजपच्या भरवश्यावर १८ खासदार आणि ५६ आमदार निवडून आणलेल्या शिवसेनेला देशपातळीवर जाणे कधीही जमले नाही. इतर कुठल्याही राज्यात सरपंचही निवडून आणता आला नाही.

हिंदुत्व सोडणार नाही, असे उद्धव कितीही सांगत असले आणि कालच्या मेळाव्यातही त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला असला तरी काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊन त्यांनी हिंदुत्वाला बगल दिली हे वास्तव आहे. लोकांमध्येही तीच भावना आहे आणि म्हणूनच हिंदुत्वावर ठाम असल्याचे उद्धव यांना वारंवार सांगावे लागत आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी रविवारच्या संघाच्या विजयादशमी उत्सवात बोलताना, ‘संघाच्या दृष्टिकोनातून हिंदुत्वाचा अर्थ व्यापक असून पूजापद्धतीशी जोडून त्याला संकुचित करण्याचा प्रयत्न  होतो. हिंदुत्व हे देशाच्या स्वत्वाचे सार आहे’ असे विधान केले. उद्धव ठाकरे यांनी भागवत यांच्या भाषणाचा धागा पकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केलेला हल्ला हा ओढूनताणून केलेला आणि बादरायण संबंध जोडलेला होता.

भागवत यांना देव मंदिरात नसतो वगैरे असे काहीही म्हणायचे नव्हते पण मंदिरे उघडा अशी मागणी करणाऱ्यांच्या काळा टोपीवाल्यांच्या डोक्याखाली मेंदू असेल तर ते भागवत यांच्या विधानाचा अर्थ समजून घेतील’ असा अनाकलनीय तर्क ठाकरे यांनी दिला. कोरोना काळात मंदिरे उघडण्यास भागवत यांचा विरोध असल्याचा अजब तर्क एकप्रकारे ठाकरे यांनी दिला. भागवत जे बोललेच नाहीत वा त्यांच्या बोलण्यातून जो अर्थच निघू शकत नाही तो स्वत:च काढून ठाकरे यांनी सरसंघचालकांचा अधिक्षेप केला. भागवत यांच्याविषयी चांगले बोलत असल्याचे दाखवायचे आणि मोदींवर टोकाची टीका करायची असे केल्याने संघ परिवारात आपल्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल, असे ठाकरे यांना वाटत असेल तर त्यांना संघ परिवार काय आहे तेच कळले नाही असे म्हणावे लागेल.

भाजपबद्दल तक्रार नाही असे म्हणायचे आणि देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल करायचे असे जे एकनाथ खडसेंनी केले तेच ठाकरे मोदींबाबत करीत आहेत. आपण शिवसेना पक्षप्रमुख आहोत पण सोबतच राज्याचे मुख्यमंत्रीदेखील आहोत याचे भान ठाकरे यांना कालच्या भाषणात नव्हते. भाजपबद्दल मनात असलेली खदखद त्यांनी बाहेर काढली. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात काहीही निघाले नाही, ठाकरे घराण्याला विनाकारण बदनाम करण्याचा प्रयत्न झाला हे सांगताना उद्धव यांनी आदित्य ठाकरे यांना क्लीन चिट दिली. मुळात या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू आहे.

सीबीआयने कोणताही अहवाल अद्याप दिलेला नाही. चौकशी सुरूच आहे. असे असताना ठाकरे मात्र परस्पर क्लीन चिट देून मोकळे झाले. ठाकरेंच्या भाषणाला प्रत्युत्तर देणारी दणकेबाज पत्र परिषद माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी सोमवारी घेतली. भाजप आणि मोदींविरुद्ध यापुढे काही बोललात तर याद राखा. मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो. मातोश्रीच्या आतल्याबाहेरच्या सगळ्या गोष्टी बाहेर काढीन’ असे राणेंनी धमकावले. यावर शिवसेना काय उत्तर देते ते पहायचे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER