उद्धवजींचे सरकार नाही रामाचे, नाही भीमाचे, नाही काही कामाचे- रामदास आठवले

पालघर : रिपाइंचे नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पुन्हा एकदा राज्यातील ठाकरे सरकारवर शरसंधान साधले आहे. त्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे (PM Narendra Modi) मोठी मागणी करत ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारवर टोलेबाजी केली. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण द्या आणि जातीनिहाय जनगणना करा, अशी मागणी रामदास आठवले यांनी मोदींना केली. पंतप्रधान मोदींना भेटून ही मागणी केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. उद्धवजींचे सरकार नाही रामाचे… नाही भीमाचे… नाही काही कामाचे, अशी खोचक टीकाही त्यांनी यावेळी ठाकरे सरकारवर केली. रिपाइंच्यावतीने विक्रमगडच्या दिवेकर वाडी येथे आदिवासी बहुजन मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी रामदास आठवले यांनी ही मागणी केली.

यावेळी कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, रिपाइंचे सुरेश बारशिंग, रिपाइं पालघर जिल्हा अध्यक्ष सुरेश जाधव, चंद्रशेखर कांबळे, राम जाधव, सतीश बोर्डे, नंदा मोरे, तेजश्री मोरे, इंदिरा दोंदे, साक्षी बोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आठवले म्हणाले, मराठा समाजाला एससी, एसटी आणि ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यात येऊ नये. त्यांना स्वतंत्र प्रवर्ग करून आरक्षण देण्यात यावे, अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. सवर्ण समाजातील गरिबांना १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा केंद्र सरकारने केला आहे. त्यात आता जोड देऊन देशातील मराठा, राजपूत आदी क्षत्रिय समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा संसदेत करावा, अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

आगामी जनगणना ही जातीच्या आधारावर करण्यात यावी. जातीनिहाय जनगणनेमुळे जातीयता वाढणार नाही तर प्रत्येक जातीला त्यांच्या संख्येनुसार योग्य न्याय वाटा मिळेल, असेही ते म्हणाले. पालघर तालुक्यात आठ तालुके दुर्गम आहेत. त्यातील एक विक्रमगड तालुका आहे. या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे. येथे मनरेगाचे काम केलेल्या आदिवासींना राज्य सरकारने अद्याप वेतन दिलेले नाही. ही दुर्दैवी बाब आहे. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही कामाचे नाही. उद्धवजींचे सरकार नाही रामाचे… नाही भीमाचे… नाही काही कामाचे, अशा टीकाही त्यांनी कवितेतून केली. पालघर जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि आदिवासी भवन उभारण्याची मागणी होत असून त्याच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER