उद्धवजी, …किमान महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होणार नाही याची काळजी घ्या – चंद्रकांत पाटलांचा टोमणा

Chandrakant Patil & Uddhav Thackreay

मुंबई : महाराष्ट्र शासनाने एका खाजगी संस्थेला स्वतःच्या जनसंपर्कासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी सुमारे ६ कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे! यावर टीका करताना भाजपाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना टोमणा मारला आहे, किमान महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होणार नाही याची काळजी घ्या.

चंद्रकांत पाटील म्हणाले – महाराष्ट्र शासनाने एका खाजगी संस्थेला स्वतःच्या जनसंपर्कासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी काही दिवसांपूर्वी सुमारे ६ कोटी रुपयांचे टेंडर काढले आहे. राज्य सरकारला असे वाटत आहे की जनतेचा त्यांच्याविषयी असलेला दृष्टिकोन बदलण्यात त्या संस्थेने मदत करावी. म्हणजे सरळ सरळ जनतेची दिशाभूल करून त्यांना चुकीच्या दिशेने नेण्यास परावृत्त करावे !

यावरून सरकारच्या कामाचे वाभाडे काढताना पाटील म्हणालेत – या सहा कोटी रुपयात २५ ते ३० हजार लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्या असत्या हा विचार राज्य सरकारने करायला हवा होता. उद्धवजी, तुमची प्रतिमा चांगली- वाईट कशीही असो, या कठीण काळात कमीत कमी महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होणार नाही याची तरी काळजी घ्या. हे पैसे खर्च करायचेच आहेत तर ते जनतेमध्ये कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी, जागरूकता निर्माण करण्यासाठी खर्च करायला हवेत. तुमची प्रतीमा तेव्हाच सुधारेल जेव्हा तुम्ही केवळ जनसंपर्क नाही तर खऱ्या अर्थाने जनहितार्थाचे कर्तव्य पार पाडाल.

या संदर्भात उल्लेखनीय आहे की – महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढले? असा सवाल करत महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराज हेच ब्रँड आहेत. त्याशिवाय कोणताच ब्रँड नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात आदर आहे. मात्र, महाराष्ट्रात फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचाच ब्रँड आहे. त्यांच्याशिवाय दुसरा कोणताच ब्रँड नाही, असे सांगताना यावरुन मनसेच्या एका नेत्याने शिवसेनेला उत्तर दिले आहे, याची आठवणही पाटील यांनी करुन दिली होती.