
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाशी दोन हात करताना अनेकांच्या मनावरदेखील राज्य करत आहेत. राज्याची काळजी घेताना ते मुख्यमंत्री असले तरी शिवसैनिकांचीही तेवढ्याच आपुलकीने विचारपूस करत त्यांना काळजी घेण्यास सांगत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाल्याने आम्ही भाग्यवान आहोत, असे भावनिक मनोगत आमदार संतोष बांगर यांनी दैनिक सामना प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. संतोष, स्वतःसह हिंगोली जिल्ह्यातील गोरगरिबांची काळजी घे, अशा आपुलकीच्या शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवर आस्थेने विचारणा केल्यामुळे शिवसेनेचे आमदार व जिल्हाप्रमुख संतोष बांगर गदगदित झाले.
शिवसेना आमदार बांगर म्हणाले, यापूर्वी पक्षाच्या कामानिमित्त व वैयक्तिक अडचणीच्या वेळेला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांना भेटलो. तसेच बऱ्याच वेळेला फोनवरदेखील बोलणे झाले. मात्र, आज उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतःहून माझ्यासारख्या शिवसैनिकाची व गोरगरिबांची आपुलकीने केलेली विचारपूस आजन्म स्मरणात राहील. संपूर्ण महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परिस्थितीशी मुकाबला करत राज्याला धीर देत आहेत. उद्धव साहेबांच्या रूपाने महाराष्ट्र एका देव माणसाच्या हाती असून कोरोनाविरुद्धचा लढा निश्चितच जिंकू, असा विश्वासही आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी व्यक्त केला.
काय घडले नेमके?
लॉकडाऊनमुळे शिवसेनेकडून हिंगोली जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांना मदत दिली जात आहे. तसेच कामानिमित्त पुणे, मुंबई, संभाजीनगर या मोठ्या शहरांत अडकून पडलेल्या नागरिकांनादेखील तेथील सहकाऱ्यांचा मदतीने मदत पोहचवली जात आहे. हिंगोली शहरासह जिल्ह्यात कुठे गोरगरिबांना, नागरिकांना काही अडचणी आहेत का ? कुठे मदतीची गरज आहे का ? याचा आढावा सहकार्यांसोबत घेत असताना अचानक मुख्यमंत्री ठाकरेंचा फोन शिवसेना आमदार व जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांना आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदार बांगर यांच्याकडून हिंगोली जिल्ह्यासह कळमनुरी मतदारसंघातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली.
तसेच स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गोरगरिबांना वाटप झालेले धान्य याबाबतची माहिती उद्धव ठाकरे यांनी जाणून घेतली. फोनवरील संभाषणाच्या सुरुवातीलाच ‘संतोष, काय वातावरण आहे तुमच्याकडे ? हिंगोलीची काय परिस्थिती आहे ? स्वतःसह गोरगरिबांची काळजी घे’ अशी आपुलकीची विचारणा व प्रेमाचा आदेश उद्धव साहेबांनी आपल्याला देऊन त्यानंतर माहिती घेतल्याचे आमदार संतोष बांगर यांनी सांगितले. तसेच नेहमीप्रमाणे गर्दीत जाणे टाळावे, गर्दी होऊ देऊ नये, गाफील अजिबात राहू नका, गोरगरिबांकडे लक्ष ठेवा, गोरगरिबांना आधार द्या, अशा सूचनाही उद्धव ठाकरे यांनी केल्याचे बांगर यांनी सांगितले.
सदर वृत्त ‘सामना’ने दिले आहे.