मध्यरात्री पवार-ठाकरे भेट, चर्चा सकारात्मक; आजच सत्ता स्थापनेचा दावा

Sharad Pawar-Uddhav Thackeray.jpg

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा जवळपास सुटला आहे. गुरुवारी राजधानी दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वात ‘महाविकास आघाडी’चं सरकार स्थापन करण्यासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर आज दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नियोजित बैठक होती. मात्र या नियोजित बैठकीआधी उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेला सोबत घेऊन शरद पवार यांच्यात सिल्व्हर ओक या निवासस्थानी गुरुवारी रात्री उशिरा पोहोचले. जवळपास तास भर चाललेल्या या बैठकीत नव्या सरकारच्या खातेवाटपावर अंतिम निर्णय झाल्याची माहिती पुढे येत आहे. बैठक संपल्यानंतर शरद पवारांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना संजय राऊतांनी सकारात्मक चर्चा झाल्याचे संकेत दिले.

दरम्यान, आज मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक बैठक होणार आहे. त्यानंतर ‘महाविकासआघाडी’ विषयी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तसंच पूर्ण पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री असतील अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तसंच शनिवारी ‘महाविकासआघाडी’चे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. तसेच सोमवारी (२५ नोव्हेंबर) ला नव्या सरकारचा शपथविधी समारोह होणार असल्याची माहितीही पुढे येत आहे.