मुख्यमंत्री ठाकरे कुठल्याही क्षणी औरंगाबादचे नामकरण `संभाजीनगर` करणार?

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची कास धरून नव्या वाटचालीला सुरुवात केली आहे. त्यातच आता औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करा! ही शिवसेनेची भूमिका मनसेकडून हायजॅक करण्यात आली आहे. आज खुद्द राज ठाकरे यांनी भाष्य करत म्हणाले की, औरंगाबादचं नाव बदललं तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत. आणि यावरून शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

या शहराचे संभाजीनगर असे नामकरण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८ मे १९८८ रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या सभेत केले होते. शिवसेना आणि छत्रपती संभाजी महाराजांवर प्रेम करणारी धर्माभिमानी जनतादेखील शहराचा उल्लेख संभाजीनगर असाच करत असतात. नामकरणाला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील आतापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची माहिती मागवून घेतली आहे. कुठल्याही क्षणी त्यांच्याकडून ‘संभाजीनगर’ असे नामकरण करण्यात आल्याची घोषणा होऊ शकते. त्यासाठी मनसेची गरज नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मनसेने केलेल्या मागणीची खिल्ली उडवली.

एनआयए तपास : किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला टोला, ‘उद्धवा, अजब तुझे सरकार’!

चंद्रकांत खैरे म्हणाले, संभाजीनगरचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र व राज्य सरकारच्या दरबारात भिजत पडला आहे. अगदी केंद्रात एनडीएचे सरकार असताना दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडेदेखील मी या संदर्भात पाठपुरावा केला होता. तेव्हा पूर्ण बहुमताचे सरकार केंद्र आणि राज्यात येऊ द्या, मग यावर निर्णय घेऊ असे त्यांनी सांगतिले होते. २०१४ मध्ये राज्यात आणि केंद्रात बहुमतासह युतीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील नेत्यांच्या माध्यमातून मी नामकरणाचा विषय मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. पण भाजपने टोलवाटोलवी केली.

आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे संभाजीनगर होऊ शकत नाही हा जावईशोध लावणाऱ्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील मंत्र्यांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल प्रेम नाही का? ते याचा विरोध करतील असे म्हणणे चुकीचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्तांकडून संभाजीनगरच्या नामकरणाच्या प्रस्तावाची सर्व माहिती मागवून घेतली आहे. कोणत्याही क्षणी या संदर्भातील निर्णय ते जाहीर करतील. तेव्हा मनसेने याची काळजी करू नये, असा टोलादेखील चंद्रकांत खैरे यांनी लगावला.