
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी सिंधुदुर्ग (Sindhudurg) दौऱ्यावेळी बंद दाराआड कोणतेही वचन दिले नव्हते सांगत युती तुटण्यासाठी पुन्हा एकदा शिवसेनेला जबाबदार धरले . यावरून शिवसेना आणि भाजपामध्ये पुन्हा वाद रंगला आहे . मात्र यावर मौन बाळगलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी अमित शहा यांचे नाव न घेता टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे पालघरमधील जव्हार दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पालघर तसा नव्याने जाहीर झालेला जिल्हा आहे.
जिल्हा म्हणून तिथे काही सोयीसुविधा निर्माण करून देणं सरकारचं कर्तव्य आहे. सोयीसुविधा निर्माण करून देताना कुपोषण ही मोठी समस्या आहे. हा विषय समोर आल्यानंतर तेवढ्यापुरते लक्ष दिले जाते . आपल्याला हे कुपोषण पूर्णपणे थांबवायचे आहे. ते जर थांबवायचे असेल तर संपूर्ण विभागाचा विकास करणे गरजेचे आहे, असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले .नुसती आरोग्य व्यवस्था सदृढ करून चालणार नाही तर आदिवासींनादेखील चांगला रोजगार मिळाला पाहिजे, जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, दळणवळण, उद्योग, पर्यटन या सर्वांचा एकत्रित विचार केला पाहिजे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी बंद दाराआड काय चर्चा झाली ते आताच सांगून टाकतो म्हणत अमित शहा यांचे नाव न घेता टोला लगावला. मी आज थोडक्यात आढावा घेतला आहे.
काही प्रस्ताव आले असून काही येणं बाकी आहे. जलगदतीने विकासाची गाडी मला रुळावर आणायची आहे. मी फक्त सवंग लोकप्रियतेसाठी काही घोषणा करणार नाही. आजपासून पालघर जिल्ह्याच्या विकासाला सुरुवात झाली आहे एवढंच सांगेन. निधी वगैरे इतर गरजा पूर्ण केल्याशिवाय सरकार शांत बसणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले . सगळ्यांची विमाने उतरतील अशी छोटी धावपट्टीही निर्माण करू, असा विकास झाला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला