उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रिपद पाच वर्षे टिकावे; पायी वारी करत प्रसाद घेऊन ते मातोश्रीकडे रवाना

Uddhav Thackeray

पंढरपूर : मागील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी पंढरपुरातील विठ्ठलभक्त तसेच व्यवसायाने शेतकरी असलेल्या सांगलीचे शिवसैनिक संजयकुमार सावंत यांनी पंढरपूरची पायी वारी केली होती. तेच सावंत आता पुन्हा पंढरपूरचा प्रसाद घेऊन मातोश्रीकडे रवाना झाले आहेत.

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बनाळी गावच्या संजयकुमार सावंत यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा यासाठी देवाचा धावा केला होता. त्यावेळी त्यांनी बनाळी ते पंढरपूर दरम्यान पायी वारी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजयकुमार यांच्या तपश्चर्येची दखल घेऊन त्यांना शपथविधीसाठी विशेष निमंत्रणही दिले होते.

हाच शिवसैनिक आता या वर्षीची कार्तिकीची वारी ‘मातोश्री’पर्यंत पोहचवण्यासाठी निघाला आहे. विठोबाचा प्रसाद घेऊन संजयकुमार हे उद्धव ठाकरे यांना भेटायला पायी निघाले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी यापुढे दरवर्षीच बनाळी ते पंढरपूर आणि पुढे मातोश्रीपर्यंत वारी करण्याचा संकल्प केला आहे.

पंढरपुरात येऊन त्यांनी चंद्रभागेचं तीर्थ, पेढे देऊन विठोबाला प्रिय तुळशी माळ घेतली आणि संत नामदेव महाराज पायरीला प्रार्थना केली. हा प्रसाद ते मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार आहेत. राज्य कोरोनामुक्त व्हावे, तसेच उद्धव ठाकरे यांचा पाच वर्षांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ निर्विघ्न पार पडावा, यासाठी संजयकुमार वारी करत आहेत.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी बरीच राजकीय तणातणी झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवण्याचा चंग बांधला होता. त्या काळात शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपद मिळावे, यासाठी शिवसैनिकांनीही उपासतापास, नवस केल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामध्ये सावंत यांची भक्ती व श्रद्धा निस्सीम ठरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER