माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही : उद्धव ठाकरे राज्यपालांवर बरसले

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनीही मंदिर खुली करण्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवले आहे. ‘हिंदुत्वाचा विसर पडून धर्मनिरपेक्ष झालात का’? असा सवाल राज्यपालांनी उपस्थित केला. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यपालांना पात्राच्या माध्यमातून प्रतिउत्तर दिले आहे .

ही बातमी पण वाचा:- ‘हिंदुत्वाचा विसर पडून धर्मनिरपेक्ष झालात का’? राज्यपालांच मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही , अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना खरमरीत उत्तर दिले .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे राज्यपालांना लिहिलेले पत्र :

माननीय राज्यपाल महोदय ,   

प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. याबद्दल सरकार जरुर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सूचना देणे, जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी व उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असेल, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी करुन दिली.

“आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मीर म्हणणार्यांचे हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. Have you suddenly turned ‘Secular’ yourselves, the term you hated? असा प्रश्न आपल्याला का पडावा? केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे Secular असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा ‘Secularism’ आहे तो आपल्याला मान्य नाही का? मला या संकटाशी लढताना काही divine premonition येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे. आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल मात्र मी एवढा थोर नाही. इतर राज्यात, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे” असेही उद्धव ठाकरेंनी सुनावले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER