राज्यात उद्धव ठाकरे यांची कामगिरी पंतप्रधान मोदी यांच्यापेक्षा सरस – सर्व्हे

Pm Modi-Uddhav Thackeray

मुंबई :- पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्या कामगिरीचा व लोकप्रियतेचा आढावा घेण्यासाठी आयएएनएस सी-व्होटर स्टेट ऑफ दी नेशन-२०२१ (IANS C-Voter State of the Nation-2021) हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणात सर्वात खराब कामगिरी करणारे अप्रिय मुख्यमंत्र्यांची नावेही प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे देशातील सर्वांत लोकप्रिय मुख्यमंत्री, तर उत्तराखंडचे भाजपचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत हे सर्वांत अप्रिय मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यापेक्षा सरस ठरली आहे.

देशातील खराब कामगिरी असलेल्या पहिल्या दहा मुख्यमंत्र्यांमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सात मुख्यमंत्री असून त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi adityanath), बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar)आदींचा समावेश आहे. तर, देशातील पहिल्या दहा लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये बिगरभाजप सात मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.

नवीन पटनायक यांच्यानंतर देशात सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्र प्रदेशचे वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांचा क्रमांक लागतो. सर्वात अप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग, कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचाही समावेश आहे. महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी मात्र त्यांच्या राज्यात पंतप्रधानांपेक्षाही सरस ठरली आहे. आंध्र प्रदेश, केरळ, दिल्ली, ओदिशा, पश्चिम बंगाल या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता मोदी यांच्यापेक्षाही जास्त आहे.

पंजाबमध्ये मोदी सर्वांत अप्रिय नेते ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कारकीर्दीतही त्यांची लोकप्रियता अनेक राज्यांत टिकून आहे. ४४.५५ टक्के लोकांचे मोदींविषयी चांगले मत आहे. सर्व राज्यांपैकी ओदिशामध्ये मोदी सर्वांत जास्त लोकप्रिय आहेत. त्यानंतर गोवा, तेलंगणाचा क्रमांक लागतो. मात्र पंजाबमध्ये मोदी सर्वांत अप्रिय नेते आहेत.

सौजन्य :   लोकमत  

ही बातमी पण वाचा : ‘शिवसेनेची विजयी घोडदौड म्हणजे जनतेकडून मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER